लाच मागितल्या प्रकरणी तलाठी कार्यालयातील मदतनीसावर गुन्हा दाखल; पिंपरीतील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2023 10:41 AM2023-02-08T10:41:29+5:302023-02-08T10:41:57+5:30
सोसायटीच्या जागेची सातबारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी ३५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली
पिंपरी : सोसायटीच्या जागेची सातबारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी ३५ हजारांची लाच मागितल्या प्रकरणी तलाठी कार्यालयातील मदतनीसाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) ही कारवाई केली.
नितीन ढमाले, असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या खासगी मदतनीसाचे नाव आहे. देहूरोड पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि. ७) गुन्हा दाखल करण्यात आला. नितीन ढमाले हा किवळे येथील तलाठी कार्यालयात खासगी मदतनीस म्हणून काम करत होता. रावेत येथील सोसायटीच्या जागेची सातबारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी ढमाले याने ३५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली, अशी तक्रार ३३ वर्षीय व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. त्यानुसार एसीबीने २६ डिसेंबर २०२२ रोजी पडताळणी केली. ढमाले याने तक्रारदार यांच्याशी चर्चा करून किवळे तलाठी यांच्यासाठी ३५ हजार रुपयांची लाच मागितल्याचे पडताळणीतून समोर आले. त्यानुसार मंगळवारी (दि. ७) याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. एसीबीचे पोलीस निरीक्षक संदीप वऱ्हाडे तपास करीत आहेत.