कोरियन तरुणीशी गैरवर्तन करणारा तरुण गजाआड, रावेत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2023 10:01 AM2023-12-20T10:01:36+5:302023-12-20T10:02:32+5:30
याचा व्हिडिओ व्हायरल होताच पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुंडा विरोधी पथकाने तरुणाला ताब्यात घेतले. ...
पिंपरी : दिवाळीमध्ये भारतात फिरण्यासाठी आलेल्या एका कोरियन व्लॉगर असणाऱ्या तरुणीसोबत पिंपरी - चिंचवड शहरात एका फळ विक्रेत्या तरुणाने गैरप्रकार करण्याचा प्रयत्न केला. ही तरुणी फळ बाजारात फिरत असताना या तरुणाने गैरवर्तन करत फोटो घेतला. याचा व्हिडिओ व्हायरल होताच पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुंडा विरोधी पथकाने तरुणाला ताब्यात घेतले.
भरत करणराव हुनुसनाळे (२९, रा. रावेत मुळ रा. कर्नाटक) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. या तरुणावर रावेत पोलिसांनी विनयभंग तसेच सार्वजनिक ठिकाणी अश्लिल वर्तन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिवाळीपूर्वी नोव्हेंबर महिन्यात एक कोरियन तरुणी भारतात फिरण्यासाठी आली होती. ती पिंपरी - चिंचवड शहरात रावेतमधील भोंडवे कॉर्नर येथे खरेदीसाठी गेली. त्यावेळी ती मोबाईलद्वारे चित्रिकरण करत होती. मात्र, त्याचवेळी येथील एका फळाच्या दुकानात काम करणारा भरत हुनुसनाळे याने कोरियन तरुणीसोबत फोटो काढला. त्यावेळी त्याने गैरवर्तन केले.
एवढ्या लांबून नसतो ओ फोटो, असा असतो फोटो, असे व्हिडिओमध्ये बोलत आहे. या प्रकारामुळे कोरियन तरुणी थोड्या त्रासिक स्वरात सर्वांना धन्यवाद देत निघून जाताना दिसत आहे. हा प्रकार तरुणीला अजिबात आवडला नसून ती घाबरल्याचेही तिच्या हावभावावरून लक्षात येते. दरम्यान, मंगळवारी (दि. १९) हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा व्हिडिओ पाहून गुंडा विरोधी पथकाने तरुणाला अटक केली.
मंगळवारी दुपारी समाजमाध्यमांवर एक व्हिहिओ व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये एक तरुण कोरियन तरुणीशी गैरवर्तन करताना दिसत आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करून तरुणाला अटक केली.
- अमरनाथ वाघमोडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, रावेत