Pimpri Chinchwad: रेल्वेच्या सेवानिवृत्त ट्रॅकमनकडे कोट्यवधींची संपत्ती, सीबीआयकडून गुन्हा दाखल
By नारायण बडगुजर | Published: March 21, 2024 05:34 PM2024-03-21T17:34:47+5:302024-03-21T17:35:16+5:30
केंद्रीय गुन्हे अन्वेषणच्या (सीबीआय) पुणे येथील लाच लुचपत प्रतिबंधक (एसीबी) विभागातर्फे ही कारवाई करण्यात आली....
पिंपरी :रेल्वेच्या सेवानिवृत्त ट्रॅक मेंटेनरकडे कोट्यवधींची संपत्ती आढळली. उत्पन्नापेक्षा जास्तीची संपत्ती असल्याने ट्रॅकमॅनच्या विरोधात गुन्हा दाखल केला. केंद्रीय गुन्हे अन्वेषणच्या (सीबीआय) पुणे येथील लाच लुचपत प्रतिबंधक (एसीबी) विभागातर्फे ही कारवाई करण्यात आली.
मल्लीनाथ भीमाशंकर नोल्ला (रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. मल्लीनाथ हा रेल्वेच्या अभियांत्रिकी (इंजिनियरिंग) विभागात ट्रॅक मेंटेनर होता. खडकी स्टेशन येथे कार्यरत असताना ऑगस्ट २०२३ मध्ये तो सेवानिवृत्त झाला. लोकसेवक असताना मल्लीनाथ याने एप्रिल २००८ ते ऑगस्ट २०२३ या कालावधीत मोठ्या प्रमाणात स्थावर आणि जंगम मालमत्ता खरेदी केली. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये स्वत:च्या तसेच कुटुंबिय आणि नातेवाईकांच्या नावाने संपत्ती घेतली. ही संपत्ती त्याच्या उत्पन्नापेक्षा खूप जास्त प्रमाणात असल्याचे सीबीआयच्या तपासातून समोर आले.
मल्लीनाथ याने मिळवलेल्या संपत्तीपैकी दोन कोटींपेक्षा जास्त किमतीची संपत्ती उत्पतन्नापेक्षा जास्त असल्याचे समोर आले. मल्लीनाथ याला दोन पत्नी असून त्यांच्यासह त्याची मुलगी, मुलगा आणि सून यांचे उत्पन्नाचे साधन नाही. तरीही त्यांच्या नावाने मिळकत व वाहने खरेदी केली, असे तपासातून समोर आले. त्यानुसार सीबीआय एसीबीने पुणे यांच्याकडून गुन्हा दाखल करण्यात आला.
सहा फ्लॅट, सात मिळकती, सहा दुचाकी, एक चारचाकी
मल्लीनाथ याने २००८ ते २०२३ या कालावधीत सर्वाधिक संपत्ती जमा केली. यात सहा फ्लॅट, सहा दुचाकी व एक चारचाकी अशी सात वाहने देखील खरेदी केली. त्याचप्रमाणे मोकळे प्लाॅट, जमीन, इमारत अशा काही मिळकतीही खरेदी केल्या. त्याचे वेतन आणि संपत्तीचे व्यवहार यात मोठी तफावत आहे. तसेच त्याने पगारातील मोठी रक्कम बचत केली असल्याचेही समोर आले.
वर्षभरासाठी केले होते तडीपार
मल्लीनाथ नाेल्ला याच्या विरोधात पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत व पुणे ग्रामीण पोलिसांकडे विविध गुन्हे दाखल आहेत. त्यावरून चिंचवड पोलिस ठाण्याकडून तडीपार बाबतचा प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार पिंपरी-चिंचवड पोलिसांनी मल्लीनाथ नोल्ला याला एक वर्षासाठी तडीपार केले होते.