मिरवणुकीत लेजर लाइट वापरल्यास गुन्हा दाखल करणार; पोलिस आयुक्त चौबे यांची तंबी
By नारायण बडगुजर | Published: September 12, 2024 10:21 PM2024-09-12T22:21:32+5:302024-09-12T22:22:01+5:30
पिंपरी-चिंचवड शहरात पाच, सात, नऊ आणि दहाव्या दिवशी विसर्जन मिरवणुका असतात.
पिंपरी : मिरवणुकांमध्ये डीजे तसेच लेजर लाइटचा वापर केला जातो. मात्र, यंदा मिरवणुकीत डीजे आणि लेजर लाइटचा वापर केल्यास गुन्हे दाखल करू, असा इशारा पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी दिला आहे. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सव मिरवणुकीत लेजर लाइटवाले पोलिसांच्या रडारवर आहेत.
पिंपरी-चिंचवड शहरात पाच, सात, नऊ आणि दहाव्या दिवशी विसर्जन मिरवणुका असतात. यात पारंपरिक वाद्य ढोलताशासह डीजेचाही दणदणाट असतो. डीजे वापराला न्यायालयाने बंदी केली आहे. त्यानुसार पोलिसांकडून अंमलबजाणी केली जात आहे. मात्र, तरीही डीजेचा वापर होत असल्याचे अनेकदा समोर आले आहे. तसेच लेजर लाइट डोळ्यांसाठी घातक असून, त्यामुळे डोळ्यांना गंभीर इजा होण्याची शक्यता असते. त्यामुळे लेजर लाइटच्या वापरास देखील पोलिसांनी मनाइ केली आहे.
गेल्या वर्षी पुणे येथील विसर्जन मिरवणुकीत लेजर लाइटमुळे अनेकांना डोळ्यांना गंभीर इजा झाली होती. त्यामुळे लेजर लाइटच्या वापराबाबत चिंता व्यक्त केली जात होती. त्याच्या वापराला मनाइ करण्याची मागणी होती. त्यानुसार पिंपरी-चिंचवड पोलिसांनी आक्रमक भूमिका घेत लेजर लाइट वापरणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. गणेशोत्सवाच्या शेवटच्या दिवशी चिंचवड आणि पिंपरी येथे मुख्य विसर्जन मिरणुका असतात. या दोन्ही ठिकाणच्या मिरवणुकांमध्ये शेकडो मंडळे सहभागी होतात. त्यांच्यातील काही मंडळांकडून डीजे तसेच लेजर लाइटचा वापर केला जाऊ शकतो. त्यामुळे या मिरवणुकांवर पोलिसांचा ‘वाॅच’ राहणार आहे.
गेल्यावर्षी हिंजवडीत एकाचा मृत्यू -
गेल्यावर्षी हिंजवडी येथे विसर्जन मिरवणुकीत डीजेच्या दणदणाटामुळे त्रास होऊन एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यामुळे पोलिसांकडून डीजेवाल्यांवर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला. त्यापाठोपाठ आता लेजर लाइट वापरणाऱ्यांवर देखील कारवाई करू, असा इशारा पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी दिला आहे.