Pimpri Chinchwad: 'मी बेडखाली बॉम्ब लपवलाय', पिंपरी-चिंचवड शहरातील रुग्णालयांना ईमेल; पोलिसांची धावपळ

By नारायण बडगुजर | Published: August 21, 2024 03:05 PM2024-08-21T15:05:05+5:302024-08-21T15:06:07+5:30

ई-मेल यूएस, कॅनडा, मेक्सिको, स्वित्झर्लंड येथून आल्याचे दर्शवण्यासाठी प्राॅक्सी आयपी ॲड्रेसचा वापर करण्यात आल्याचे समोर आले आहे

a dangerous email to hospital in Pimpri Chinchwad city Police are investigating | Pimpri Chinchwad: 'मी बेडखाली बॉम्ब लपवलाय', पिंपरी-चिंचवड शहरातील रुग्णालयांना ईमेल; पोलिसांची धावपळ

Pimpri Chinchwad: 'मी बेडखाली बॉम्ब लपवलाय', पिंपरी-चिंचवड शहरातील रुग्णालयांना ईमेल; पोलिसांची धावपळ

पिंपरी : शहरातील रुग्णालयांमध्ये बाॅम्ब ठेवला असल्याबाबतचा ‘ई-मेल’ मिळाल्यानंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांची धावपळ झाली. हा ई-मेल यूएस, कॅनडा, मेक्सिको, स्वित्झर्लंड येथून आल्याचे दर्शवण्यासाठी प्राॅक्सी आयपी ॲड्रेसचा वापर करण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ई-मेल कोणी पाठवला याचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. 

पिंपरी - चिंचवड शहरातील निगडी, भोसरी आणि चिंचवड परिसरातील तीन रुग्णालयांमध्ये बॉम्ब ठेवला असल्याचा ई-मेल रुग्णालयाला प्राप्त झाला. त्यामध्ये दहशतवादी संघटनेचे नाव वापरण्यात आले. याबाबत धन्वंतरी रुग्णालय प्रशासनाकडून निगडी पोलिसांना माहिती देण्यात आली. निगडी पोलिसांनी रुग्णालयात धाव घेत बॉम्ब शोधक नाशक पथकाला पाचारण केले. पथकाने रुग्णालयाचा परिसर पिंजून काढला. मात्र कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही. त्याचवेळी भोसरी परिसरातील मेडिक्लोवर आणि चिंचवड येथील मोरया या रुग्णालयांना देखील अशाच प्रकारचा मेल प्राप्त झाला.

खबरदारी म्हणून पोलिसांनी त्या दोन्ही रुग्णालयांमध्ये पाहणी केली. मात्र तिथे देखील कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही. तीनही रुग्णालयांना आलेल्या ई-मेलमध्ये एका दहशतवादी संघटनेचे नाव वापरण्यात आले आहे. तसेच रविवारी (दि. १८) सकाळी एकाच वेळी ५० पेक्षा जास्त ई-मेल ॲड्रेसवर हा मेल करण्यात आला. यात बहुतांश रुग्णालयांना मेल पाठवण्यात आला. पिंपरी-चिंचवडसह इतर शहरांतील तसेच इतर राज्यांतील काही ठिकाणी हा ई-मेल पाठवण्यात आला असावा, अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.

‘आयपी ॲड्रेस’ची होईना उकल

बाॅम्ब ठेवल्याचा ‘मेल’ पाठवण्यासाठी संशयिताने ‘जी-मेल’चा वापर केला. त्यामुळे याबाबत पोलिसांनी ‘गुगल’कडे विचारणा केली. आयपी ॲड्रेस आणि माेबाइल क्रमांक किंवा इतर माहिती मागवली. मात्र, आवश्यक माहिती उपलब्ध झाली नाही. त्यामुळे गुगलकडे पुन्हा विचारणा करण्यात आली आहे. भारतातून ई-मेल केला आहे की, देशाच्या बाहेरून हे कृत्य करण्यात आले आहे, कोणते डिव्हाइस आणि तंत्रज्ञान त्यासाठी वापरण्यात आले आहे, याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे. 

ई-मेलव्दारे खोडसाळपणा?

बाॅम्ब ठेवल्याचा ई-मेल करून कोणी खोडसाळपणा केला आहे की, दहशत पसरविण्याचा प्रकार आहे यासह इतरही बाजूंनी पोलिसांकडून तपास सुरू आहे. नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहण्याचे आवाहन पिंपरी-चिंचवड पोलिसांनी केले आहे.

निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

रुग्णालयात बाॅम्ब ठेवल्याप्रकरणी ई-मेल करणाऱ्यांविरोधात निगडी पोलिस ठाण्यात मंगळवारी (दि. २०) गुन्हा दाखल करण्यात आला. सुधीर रंगराव पाटील  (रा. प्राधिकरण निगडी) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली. प्राधिकरण निगडी येथील धन्वंतरी रुग्णालयाच्या ई-मेल आयडीवर बाॅम्ब ठेवल्याचा ईमेल आला. ‘‘मी हाॅस्पिटलच्या इमारतीत बाॅम्ब ठेवला आहे. बाॅम्ब हाॅस्पिटलच्या बेडखाली आणि बाथरुममध्ये लपवलेले आहेत. इमारतीमधील प्रत्येक व्यक्ती मारली जाईल किंवा त्यांचे हातपाय गमावतील. या नरसंहारामागे चिंग आणि कल्टिस्ट आहेत’’ असा मजकूर ई-मेलमध्ये आहे. 

Web Title: a dangerous email to hospital in Pimpri Chinchwad city Police are investigating

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.