गाढवाचे लग्नमधील गंगी; झाशीची राणीतील 'रसिकाच्या मना'ची राणी: प्रभा शिवणेकर काळाच्या पडद्याआड

By विश्वास मोरे | Published: May 31, 2024 08:08 PM2024-05-31T20:08:23+5:302024-05-31T20:09:01+5:30

मराठी लोकनाट्य आणि रंगभूमीवर प्रभा शिवणेकर सात दशके योगदान दिले

a drama of gadhwach lagn fame senior celebrity prabha shivnekar passed away | गाढवाचे लग्नमधील गंगी; झाशीची राणीतील 'रसिकाच्या मना'ची राणी: प्रभा शिवणेकर काळाच्या पडद्याआड

गाढवाचे लग्नमधील गंगी; झाशीची राणीतील 'रसिकाच्या मना'ची राणी: प्रभा शिवणेकर काळाच्या पडद्याआड

पिंपरी: मराठी लोकरंगभूमी समृद्ध करणारी, गाढवाचे लग्नमधील गंगी आणि झाशीची राणी या नाटकाने 'रसिकाच्या मना'ची राणी बनलेल्या प्रभा शिवणेकर ( वय ८१) यांचे शुक्रवारी निधन झाले. पिंपरी परिसरातील एका खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे नातू सचिन कदम यांनी त्यांचा अखेरपर्यंत सेवा केली. मुळशी तालुक्यातील भालगुडी या त्यांच्या जन्मगावी शुक्रवारी सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

मराठी लोकनाट्य आणि रंगभूमीवर प्रभा शिवणेकर सात दशके योगदान दिले. अभिनय आणि संवादफेकीच्या जोरावर खिळवून ठेवणे हे त्याचे वैशिष्ट्य.  १९५०-८०च्या दशकात गाढवाचं लग्न या मूळ वगनाट्यातील गंगीची भूमिका रसिकांच्या हृदयावर कोरली आहे. शिवणेकर यांनी वगसम्राट दादू अभिनय सम्राट शंकरराव शिवणेकर, शाहीर अमर शेख, विठाबाई नारायणगावकर, रघुवीर खेडकर, कांताबाई सातारकर, तुकाराम खेडकर आणि चंद्रकांत ढवळपुरीकर यांच्या तमाशा फडात काम केले. त्यांच्या अभिनयाची दखल घेऊन जपान आणि अमेरिकेतील कलावंतांनी शिवणेकर यांना भारताच्या पॉलिमुनी म्हणून संबोधले.  गाढवाचं लग्न पाहिल्यानंतर शिरीष पै यांनी दाद दिली होती. गंगी नसती तर दादोबाचा सावळा कुंभारही फिका पडला असता. 

प्रभाव शिवणकर यांनी शाहीर अमर शेख यांच्या कलापथकात तीन वर्षे काम केलं होतं, संयुक्त महाराष्ट्र चळवळीत योगदान होतं. प्रभा शिवणेकर यांनी १०० हून अधिक भूमिका केल्या. झाला उद्धार वाल्मीकीचा, चित्ता फाडला जावळीचा, झाशीची राणी, चोखामेळा, दिल्ली हातातून गेली या समाजप्रबोधनपर वगनाट्यात प्रभा शिवणेकर यांनी साकारलेल्या मूळ भूमिका अजरामर झाल्या.  संगीत नाट्य अकादमीने त्यांना १९७४ मध्ये तत्कालीन राष्ट्रपतीच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार, राज्य शासनाच्या विठाबाई नारायणगावकर पुरस्कार अशा विविध पुरस्कारांनी गौरविले आहे. 

ज्येष्ठ साहित्यिक प्रभाकर ओव्हाळ यांनी  प्रभा शिवणेकर यांच्या जीवनावर आधारित एका गंगीची कहाणी हा चरित्रग्रंथ लिहिला आहे. प्रभाकर ओव्हाळ म्हणाले, राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त वगनाट्यातील गंगीची लाईफटाइम एक्झिट ही मनाला चटका लावणारी आहे.  मराठी साहित्यसम्राट पु.ल. देशपांडे यांनी प्रभा शिवणेकर यांच्या जातिवंत अभिनयाची शिफारस संगीत नाटक अकादमीस केली होती. अभिनय आणि लोकरंगभूमीची एक फळी कोसळून पडली आहे.'

Web Title: a drama of gadhwach lagn fame senior celebrity prabha shivnekar passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.