ज्वारीच्या शेतात ड्रोन भिरभिरला आणि बिबट्या वनविभागाच्या जाळ्यात सापडला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2023 08:43 PM2023-12-29T20:43:36+5:302023-12-29T20:45:01+5:30
बिबट्या दिसला आणि योग्य नियोजन करून त्याला जाळ्यात पकडले, असा अनुभव वन्यजीव व्यवस्थापन संचालक नचिकेत उत्पात यांनी सांगितला....
पिंपरी : वन्यजीव पकडणाऱ्या टीमचा फोन पहाटे साडेसहाला खणखणला. मग आम्ही बातमीची खात्री केली. वनविभागास कळवून सातला चिखलीत दाखल झालो. त्यावेळी तीन तास बिबट्याचा माग काढला. तो ज्वारीच्या शेतात लपल्याचे दिसून आल्यावर ड्रोनने लोकेशन शोधले. बिबट्या दिसला आणि योग्य नियोजन करून त्याला जाळ्यात पकडले, असा अनुभव वन्यजीव व्यवस्थापन संचालक नचिकेत उत्पात यांनी सांगितला.
मोशी चिखली परिसरात गुरुवारी सकाळी बिबट्या आल्याची बातमी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली आणि परिसरातील लोकांची पाचावर धारण बसली. सर्वत्र घबराट पसरली होती. अशावेळी सजग नागरिकांनी वनविभाग आणि वन्यजीव व्यवस्थापनास कळविले. याविषयीची आँखोदेखी संचालक नचिकेत उत्पात यांनी सांगितली.
नचिकेत उत्पात म्हणाले, वनविभागाकडून सकाळी साडेसहाच्या सुमारास आम्हाला चिखली येथील लाकूड साठवण शेडमध्ये बिबट्या आहे, अशी माहिती मिळाली. आम्ही लगेच एक पथक तयार केले. सातला आम्ही स्पॉटला पोहोचलो. त्यावेळी आम्हाला समजले की बिबट्या शेडमध्ये शिरला नव्हता तर त्याच्याशेजारी असलेल्या खिडिकीतून गेला होता. हा परिसर घरे आणि शेतीचा होता. त्याचवेळी आम्हाला माहिती मिळाली कि, एका बंगल्यातील गोठ्यात बिबट्या असल्याची माहिती मिळली. तसा हा परिसर गर्दीचा आणि बिबट्यामुळे बघ्यांची मोठ्याप्रमाणावर गर्दी झाली होती.
यावेळी पुणे वनविभागाचे डीसीएफ मोहिते म्हणाले, “मानवी वस्ती अधिक आहे. दाट झाडीही आहे. त्यामुळे आपल्यासमोर दुहेरी आव्हान आहे." याचवेळी तुहीन सातारकर हे थर्मल ड्रोनद्वारे बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेऊन होते. बिबट्या शेडमध्ये असल्याने टीममधील डॉ. चेतन वंजारी यांनी त्याला शांत करण्यासाठी तयारी केली. त्यावेळी डार्ट गन पाहिल्यावर बिबट्या थोडा काहीसा बिथरला. तो एक गंभीर क्षण होता, मात्र आम्ही सगळे सज्ज झालो होतो. त्याने जागा सोडली. त्याचवेळी लोकांचीही सुरक्षितता पाहायची होती. अशावेळी पोलिसांनी गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली.
त्यानंतर बिबट्या ज्वारीच्या गेला. आणखीनच आव्हान वाढले. त्यावेळी जाळी वापरणे अवघड होते आणि जोखीमही होती, अशा अध्यक्षा नेहा पंचमिया म्हणाल्या. अशावेळी अग्निशमन विभागाची स्कायलिफ्ट कामाला आली. मग आम्ही ड्रोन शेतात सोडले. त्याचे लोकेशन कन्फर्म केले. त्यानंतर “स्कायलिफ्टवरून डॉ. वंजारी यांनी बिबट्याला उंचावरून अचूक कोनात पहिले आणि डॉर्ट मारला. तो योग्य ठिकाणी बसला. मग, सात मिनिटे वाट पहिली. ड्रोनने पुन्हा पहिले बिबट्या पूर्णपणे शांत झाला होता. मग, आमची टीम पुढे सरसावली. दहाच्या सुमारास सुरक्षितपणे बिबट्यास पकडले आणि पिंजऱ्यात टाकून पुण्यातील केंद्रात दाखल केले. या मोहिमेत वनाधिकारी महादेव मोहिते, दीपक पवार, मुख्य वन्यजीव पशुवैद्यक डॉ. चेतन वंजारी, तुहीन सातारकर यांचा समावेश होता. हा बिबट्या अंदाजे ३ वर्षांचा नर जातीचा आहे. हे मिशन पुणे वनविभाग, महापालिका अग्निशमन विभाग आणि पोलिस विभाग यांच्या एकत्रित प्रयत्नांने पूर्ण झाले. बिबट्याची तब्येत चांगली असून वैद्यकीय तापसण्यानंतर त्याला वनविभागाच्या वतीने जंगलात सोडले जाणार आहे.