कामावर का जात नाही, असे विचारल्याने दारुड्या मुलानेच केला आईचा खून; पिंपरीतील धक्कादायक घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2023 01:14 PM2023-03-23T13:14:11+5:302023-03-23T13:19:29+5:30
तरुण चार वर्षानंतर जेलमधून सुटल्यानंतर दारुचा व्यसनी झाला
पिंपरी : कामावर का जात नाही, अशी विचारणा महिलेने तिच्या मुलाला केली. याचा राग आल्याने मद्यपी मुलाने सिमेंटचा गट्टू महिलेच्या डोक्यात मारला. त्यामुळे गंभीर जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी मुलाला अटक केली. हा प्रकार ९ मार्च रोजी निराधार नगर, पिंपरी येथे घडला.
परेगाबाई अशोक शिंदे (वय ५८), असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. विश्वास अशोक शिंदे (वय ३०, रा. निराधानगर, पिंपरी) असे अटक केलेल्या मुलाचे नाव आहे. पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, परेगाबाई यांचा मुलगा विश्वास हा कचऱ्याच्या घंटागाडीवर मजूर म्हणून काम करत होता. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी विश्वास हा २०१५ पासून चार वर्षे येरवडा जेलमध्ये होता. जेलमधून सुटल्यानंतर विश्वास दारुचा व्यसनी झाला. नशेत तो विनाकारण त्याची आई परेगाबाई यांच्याशी भांडणतंटा करायचा. परेगाबाई या कचरा गोळा करण्याचे काम करून कुटूंबाचा उदरनिर्वाह करीत होती.
दरम्यान, ९ मार्च रोजी सकाळी आठच्या सुमारास दारुच्या नशेत झोपलेला विश्वास याला उठवण्याचा परेगाबाई यांनी प्रयत्न केला. कामावर का जात नाही, अशी विचारणा परेबाईने केली. त्याचा राग आल्याने परेगाबाई यांच्या डोक्यात सिमेंटचा ब्लॉक (गट्टू) मारला. त्यामुळे ती जिव वाचविण्यासाठी पळत सुटली. विश्वास याने पाठलाग केला. त्यावेळी परेगाबाई पायात पाय अडकून पडली. तिचा आरडाओरडा ऐकून लोक जमा झाले. त्यावेळी विश्वास निघून गेला. परेगाबाई व विश्वास यांच्यातील भांडणाबाबत शेजारच्यांना माहिती होते. परंतू, ती पाय घसरून पडून गंभीर जखमी झाली असा समज होता. परेगाबाई यांना त्यांच्या मुलीने तळेगाव येथील रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान परेगाबाईचा मृत्यू झाला. याबाबत गुन्हे शाखा युनिट २ च्या पथकाने तपास सुरू केला. आईचा मृत्यू झाल्याचे समजल्यानंतर विश्वास शिंदे पळून जाण्याच्या तयारीत होता. त्यावेळी पोलिसांनी त्याला पकडले. त्याच्या विरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. गुन्हे शाखा युनिट २ चे पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम, उपनिरीक्षक गणेश माने, सहायक फौजदार शिवानंद स्वामी, पोलीस कर्मचारी दिलीप चौधरी, आतिश कुडके, अजित सानप, शिवाजी मुंढे, उध्दव खेडकर यांनी केली आहे.