कर्णकर्कश आवाज करणाऱ्या ‘बुलेटराजांचे' धाबे दणाणले; सहा महिन्यात २२ लाखांचा दंड आकाराला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2022 09:31 PM2022-06-30T21:31:44+5:302022-06-30T21:31:55+5:30

जानेवारी ते जून या सहा महिन्यांच्या कालावधीत २२१४ बुलेटस्वारांवर कारवाई करून २२ लाख १४ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला

A fine of bulet Rs 22 lakh was imposed in six months in pimpari | कर्णकर्कश आवाज करणाऱ्या ‘बुलेटराजांचे' धाबे दणाणले; सहा महिन्यात २२ लाखांचा दंड आकाराला

कर्णकर्कश आवाज करणाऱ्या ‘बुलेटराजांचे' धाबे दणाणले; सहा महिन्यात २२ लाखांचा दंड आकाराला

googlenewsNext

पिंपरी : कर्णकर्कश आवाज काढत रस्त्यावर भरधाव जाणाऱ्या बुलेटस्वारांवर पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या वाहतूक शाखेकडून कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. जानेवारी ते जून या सहा महिन्यांच्या कालावधीत २२१४ बुलेटस्वारांवर कारवाई करून २२ लाख १४ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला. तसेच २६ ते २९ जून या चार दिवसांमध्ये ३७ बुलेटस्वारांवर गुन्हे देखील दाखल करण्यात आले. त्यामुळे बेशिस्त बुलेटस्वारांचे धाबे दणाणले असून, आपली बुलेट रस्त्यावर न काढलेलीच बरी, असे म्हणण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. 

ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून काही बेशिस्त वाहनचालक त्यांची वाहने दामटून वाहतूक नियमांचे उल्लंघन करतात. यातून वायू तसेच ध्वनी प्रदूषणात भर पडते. तसेच वाहनांचा खोळंबा होऊन वाहतूक कोंडी होते. तसेच अपघाताचीही शक्यता असते. त्यामुळे अशा बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांकडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत शहरातील मुख्य रस्ते, महत्त्वाचे चौक आदी ठिकाणी वाहनांची तपासणी केली जात आहे. 

सायलेन्सरमध्ये बदल करून काही बुलेटवाल्यांकडून फटाक्यांचा आवाज काढला जातो. भर रस्त्यात वर्दळीच्या ठिकाणी, शाळा, महाविदल्यालये, तसेच सिग्नलवर देखील असा आवाज काढला जातो. या कर्णकर्कश्य आवाजामुळे इतर वाहनचालक तसेच नागरिकांचे लक्ष विचलीत होते. रुग्णालय परिसर तसेच शांतता क्षेत्रात देखील अशा बुलेटस्वारांकडून धुमाकूळ घालण्यात येतो. त्यांना आवर घालण्यासाठी विशेष मोहिमेंतर्गत पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. 

सायलेन्सर बदलणारे गॅरेजवाले रडारवर

शहरातील काही गॅरेजवाले बुलेटचे सायलेन्सर बदलून देतात. सायलेन्सर सहज बदलून मिळत असल्याने बुलेटस्वारांचे फावते. त्यामुळे अशा गॅरेजवाल्यांची माहिती संकलित करण्यात येत आहे. त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. 

पिंपरी-चिंचवड पोलिसांनी केलेली कारवाई

महिना - दाखल खटले - दंड (रुपयांमध्ये)
जानेवारी - ४१२ - ४१२०००
फेब्रुवारी - २०१ - २०१०००
मार्च - १२३ - १२३०००
एप्रिल - ५१९ - ५१९०००
मे - ४१९ - ४१९०००
जून - ५४० - ५४००००

''बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्यात येत आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन होत असल्याने अपघातांचे प्रमाण वाढत आहे. ते टाळण्यासाठी वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे.  - आनंद भोईटे, पोलीस उपायुक्त, पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखा'' 

Web Title: A fine of bulet Rs 22 lakh was imposed in six months in pimpari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.