Pimpri Chinchwad: कंपन्यांमध्ये चोऱ्या करणारी टोळी जेरबंद; चोरीसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
By नारायण बडगुजर | Published: December 13, 2023 06:35 PM2023-12-13T18:35:26+5:302023-12-13T18:38:22+5:30
या टोळीतील प्रमुख गुन्हेगारांनी अल्पवयीन मुलांची टोळी बनवून त्यांच्या माध्यमातून चोऱ्या केल्याचे उघडकीस आले....
पिंपरी : रेकी करून पिंपरी-चिंचवड व पुणे शहरात चोऱ्या करणाऱ्या उत्तर प्रदेशमधील टोळीला जेरबंद करण्यात आले. या टोळीकडून कंपन्यांमधील तांबे व इतर साहित्य चोरी केली जात होती. चिखली पोलिसांनी याप्रकरणी तिघांना अटक केली. त्यांच्याकडून २४ लाख ४५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. या टोळीतील प्रमुख गुन्हेगारांनी अल्पवयीन मुलांची टोळी बनवून त्यांच्या माध्यमातून चोऱ्या केल्याचे उघडकीस आले.
अब्दुलकलाम रहिमान शहा (२३, रा. कुदळवाडी, चिखली. मूळ रा. उत्तर प्रदेश), योगेश तानाजी चांदणे (२६, रा. जाधववाडी, चिखली), रविशंकर महावीर चौरासिया (२३, रा. मोईगाव, ता. खेड. मूळ रा. उत्तर प्रदेश), अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांचे साथीदार रिझवान खान, शकील मन्सुरी आणि दोन अल्पवयीन मुलांचा पोलिस शोध घेत आहेत.
पोलिस उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील काही दिवसांपासून औद्योगिक परिसरात चोऱ्यांचे प्रमाण वाढले होते. त्याबाबत चिखली पोलिस वारंवार ठिकठिकाणी सापळा लावत होते. दरम्यान वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर यांनी एक पथक तयार करून घरफोडी झालेल्या ठिकाणांची माहिती घेऊन तांत्रिक विश्लेषण करण्याच्या सूचना पथकाला दिल्या. या पथकाला गुन्हा घडलेल्या ठिकाणी येणारे संशयित इतर ठिकाणीही दिसले. त्यानुसार त्यांची ओळख पटवून अब्दुलकलाम याला चिखली पोलिसांनी चिखली येथून ताब्यात घेतले. तो चोरीचा माल विक्रीसाठी आला होता. त्याने त्याच्या साथीदारांसोबत मिळून पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरात चोऱ्या केल्याचे सांगितले. चोरलेला माल वाहून नेण्यासाठी योगेश चांदणे याचा टेम्पो वापरत असत. पोलिसांनी योगेश चांदणे आणि रविशंकर चौरासिया या दोघांना टेम्पोसह ताब्यात घेतले.
संशयितांकडून ग्राइंडर मशीन, पोपट पाना, चार्जेबल ट्यूब लाईट, ब्युटेन गॅस गन, लोखंडी छन्न्या, कुऱ्हाडीचे पाते, ड्रीलमशीन, स्टील बोल्ड कटर, हेक्सा फ्रेम, टी पाना, स्क्रू ड्रायव्हर, हातोडा असे घरफोडीसाठी लागणारे साहित्य जप्त केले.
चिखली, चाकण, दिघी, कोंढवा, भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत संशयितांनी चोरीचे एकूण आठ गुन्हे केले. त्यात त्यांनी ५२ लाख ६५ हजार ९५८ रुपये किमतीचा ऐवज चोरला. पोलिसांनी संशयितांकडून २४ लाख ४५ हजार १४० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.
पोलिस उपायुक्त संदीप डोईफोडे, सहायक पोलिस आयुक्त डॉ. विवेक मुगळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर, सहायक निरीक्षक तौफिक सय्यद, पोलीस अंमलदार बाबा गर्जे, सुनील शिंदे, चेतन सावंत, विश्वास नाणेकर, भास्कर तारळकर, संदीप मासाळ, दीपक मोहिते, अमर कांबळे, कबीर पिंजारी, संतोष सकपाळ, संतोष भोर यांनी केली.
बंद असलेल्या कंपन्यांमध्ये चोरी
संशयित हे मुळचे उत्तर प्रदेश येथील रहिवासी आहेत. त्यांनी अल्पवयीन मुलांचा समावेश असलेली एक गुन्हेगारी टोळी बनवली. ते टोळीने पुणे शहरात येतात. एका ठिकाणी खोली भाड्याने घेऊन राहतात. त्यानंतर परिसरात रेकी करतात. विशेषतः ही टोळी बंद कंपन्यांमध्ये चोरी करते. रेकी करून बंद असलेल्या कंपन्यांमध्ये चोरी करत आणि चोरीचा माल टेम्पोमधून लंपास करत असत.