प्रसाद पावन होण्यास सोन्याची चेन ठेवली, भोंदूने हडपली; पिंपरी-चिंचवड शहर परिसरातील घटना
By प्रकाश गायकर | Published: February 23, 2024 03:34 PM2024-02-23T15:34:16+5:302024-02-23T15:34:53+5:30
प्रसादाची पिशवी देताना हातचलाखीने पिशवीतील ५० हजार रुपये किमतीची सोन्याची चेन काढून घेत दोघे दुचाकीवरून पसार झाले....
पिंपरी : पिशवीमध्ये बिस्कीटचे पुडे ठेवून तो प्रसाद पावन होण्यासाठी गळ्यातील सोन्याची चेन ठेवण्यास सांगितले. हा प्रसाद देवाला दाखवण्याच्या बहाण्याने त्यातील सोन्याची चेन हातचलाखीने काढून घेण्यात आली. ही घटना इंदोरी येथे जोतिबा मंदिराजवळ गुरुवारी (दि. २२) सायंकाळी पाचच्या सुमारास घडली.
याप्रकरणी नारायण मारुती चव्हाण (५८, रा. चव्हाणवाडा, इंदोरी) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दोन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चव्हाण गुरुवारी जोतिबाच्या मंदिरात दर्शनासाठी गेले होते. तेथे दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांच्या हातात प्लास्टिकची पिशवी देत त्यात पाच बिस्कीटचे पुडे व १२०० रुपये ठेवले. त्याच पिशवीमध्ये फिर्यादी यांच्या गळ्यातील सोन्याची चेन ठेवण्यास सांगितले. हा प्रसाद देवाला वाहण्यास सांगितला. त्यानंतर फिर्यादी यांच्याकडे प्रसादाची पिशवी देताना हातचलाखीने पिशवीतील ५० हजार रुपये किमतीची सोन्याची चेन काढून घेत दोघे दुचाकीवरून पसार झाले.