तक्रार केल्याच्या कारणावरून चोरी करून घर पेटवले; आठ लाखांचे नुकसान
By नारायण बडगुजर | Published: December 24, 2023 06:49 PM2023-12-24T18:49:47+5:302023-12-24T18:50:10+5:30
आगीमध्ये घरातील साहित्य जळून खाक
पिंपरी : तक्रार केल्याच्या कारणावरून एका व्यक्तीने घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर घर पेटवून दिले. यामध्ये घरातील साहित्य जळून आठ लाखांचे नुकसान झाले. तळेगाव दाभाडे येथील चावडी चौकात शनिवारी (दि. २३) सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली.
अजय बाळकृष्ण पिंगळे (रा. तळेगाव दाभाडे) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. संजय रमेश बावीसकर (४३, रा. कडोलकर कॉलनी, तळेगाव दाभाडे) यांनी याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संजय यांनी संशयित अजय पिंगळे याच्या विरोधात तक्रार दिली. त्याचा राग मनात धरून अजय याने फिर्यादी संजय यांच्या सदनिकेचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील चार हजारांचे गॅस सिलेंडर आणि गिझर चोरी केले व घराला आग लावली. आगीमध्ये घरातील साहित्य जळून खाक झाले. यात संजय यांचे आठ लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचे फिर्यादीत नमूद आहे.