Sant Tukaram Maharaj palkhi:आषाढी वारीच्या परतीचा प्रवास संपला! तुकोबा देहुनगरीत दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2022 05:14 PM2022-07-24T17:14:33+5:302022-07-24T17:14:40+5:30
ग्रामस्थांनी फुलांच्या पायघड्या घालत पालखी रथावर फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव करून स्वागत केले.
देहूगाव : जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचा ३३७ वा पालखी सोहळा 35 दिवसांची आषाढी वारी संपवुन पंढरपूरहुन आज दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास देहूनगरीत दाखल झाले. यावेळी परिसरातील ग्रामस्थ व भाविकांनी पालखीचे प्रवेशद्वार कमानीमध्ये मोठ्या उत्साहात व मोठ्या भक्तीभावाने स्वागत केले. माळीनगर मध्ये ग्रामस्थांनी फुलांच्या पायघड्या घालुन व पालखीसोहळ्यावर आणि पालखी रथावर फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव करून स्वागत केले.
पालखी मंदिरात पोहचल्यानंतर भाविकांनी संत तुकाराम महाराजांचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती. पालखी महाद्वार कमानीमध्ये(पूर्वीची वेस) आल्यानंतर येथील तुपे कुटुंबियांकडून दही भाताचा नैवद्य दाखवून बैलाचे व पालखी रथाचे पुजन व औंक्षण करूण स्वागत केले. तत्पुर्वी पालखी चिंचोली येथील शनीमंदिर परिसरातील पटांगणावर काही काळ विसावली होती. दुपारी एकच्या सुमारास पालखी विसावा संपवुन देहूकडे मार्गस्थ झाली. पालखी नेहमी प्रमाणे बाजारआळी मार्गे जन्मस्थान मंदिर व विश्वबंर महाराज मंदिरा समोर आल्यानंतर 'श्री संताचीये माथा चरणावरी सांष्टांग हे करी दंडवत' या अभंग गायन झाल्यानंतर संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महारांजांची आरती घेतली.
पालखी महाद्वारात आल्यानंतर 'तुझे द्वारीचा कुतरा / नको मोकलू दातारा // धरने घेतले दारात नको /उठवू धरोनी हात //' प्रथेप्रमाणे अभंग घेवून पालखीने मंदीरात प्रवेश केला. मंदीराच्या आवारात प्रदक्षिणा घालून पालखी संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदीरापुढे आली. येथे अभंग गायन झाल्यानंतर महारांजांची आरती झाली. पालखी भजन मंडपात आल्यानंतर संत नामदेव महाराजांचा 'देह जावा अथवा राहो / पांडूरंगी दृढ भाव // चरण न सोडी सर्वथा / आण तुझी पंढरीनाथा //'हा अभंग गायला. या अभंगानंतर वारीत सहभागी झालेल्या सर्व दिंड्यांच्या विणेकऱ्यांना पालखी सोहळा प्रमुख माणिक महाराज मोरे, संतोष महाराज मोरे व विशाल महाराज मोरे यांच्या हस्ते मानाचा श्रीफळ प्रसाद देवून पालखी सोहळयाची सांगता करण्यात आली. यावेळी संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे, अजित महाराज मोरे, संजय महाराज मोरे, भानुदास महाराज मोरे उपस्थित होते. संस्थानच्या वतीने सर्व भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यानंतर पालखी सोहळ्याची सांगता झाली. पालखी मार्गावर वहातूक व्यवस्था व पोलीसांचा बंदोबस्त चोख होता. मार्ग पालखी गावाच शिरताच देहू आळंदी रस्त्यावरील वहातूक मोकळी केल्याने त्यातच पालखी सोहळ्यात सहभागी झालेली वाहने रस्त्याच्या दोन्ही बाजुंनी उभी केली असल्याने वहातूक खोळंबली होती.