बनावट सोने तारण ठेवून घेतले २७ लाखांचे कर्ज; निगडी पोलिसांकडून दोघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2023 06:04 PM2023-02-04T18:04:18+5:302023-02-04T18:06:20+5:30
पोलिसांनी याप्रकरणी दाेघांना अटक केली आहे...
पिंपरी : तिघांनी मिळून ८१३.७ ग्रॅम वजनाचे बनावट सोने तारण ठेवून २७ लाख ८० हजार १०० रुपये घेतले. सोने बनावट असल्याचे समजल्यानंतर सोने तारण घेणाऱ्या कंपनीने पैशांची मागणी केली. त्यावेळी कंपनीच्या अधिकाऱ्याला जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी दाेघांना अटक केली. हा प्रकार १९ मार्च २०२१ ते २५ मार्च २०२२ या कालावधीत निगडी येथे घडला.
हिमगिरी हायर पर्चेस लिमिटेड कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक दिनेश राजमल जैन (वय ५२) यांनी याप्रकरणी शुक्रवारी (दि. ३) निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. संतोष भागवत बागल (वय ४०, रा. किवळे), सुनील काशिनाथ वाघमारे (वय ४७, रा. किवळे) असे अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्यासह राहुल भीमाप्पा बालीगर (वय ४०, रा. देहूरोड) याच्या विरोधातही पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिमगिरी हायर पर्चेस लिमिटेड ही कंपनी सोने तारण घेऊन कर्ज देण्याचे काम करते. आरोपींनी ८१३.७ ग्रॅम वजनाचे बनावट सोने आणले. सोने खरेदीच्या खोट्या पावत्या दाखवून जैन यांच्या कंपनीकडून २७ लाख ८० हजार १०० रुपये सोने तारण कर्ज आरोपींनी घेतले. घेतलेले कर्ज परत न करता कंपनीची फसवणूक केली. तसेच कर्जाची रक्कम मागितली असता संतोष बागल याने फोनवरून जीवे मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत नमूद आहे.