आळंदीत लाठीमार नव्हे किरकोळ झटापट; पिंपरी चिंचवडच्या पोलीस आयुक्तांचे स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2023 09:36 AM2023-06-12T09:36:39+5:302023-06-12T09:37:42+5:30

एका दिंडीसोबत केवळ ७५ जणांना प्रवेश देण्याचा निर्णय मानाच्या दिंडीप्रमुखांनीही मान्य केला होता, मात्र अचानक काही स्थानिक युवकांनी मध्ये घुसण्याचा प्रयत्न केला

A minor skirmish not a stick attack Clarification of Police Commissioner of Pimpri | आळंदीत लाठीमार नव्हे किरकोळ झटापट; पिंपरी चिंचवडच्या पोलीस आयुक्तांचे स्पष्टीकरण

आळंदीत लाठीमार नव्हे किरकोळ झटापट; पिंपरी चिंचवडच्या पोलीस आयुक्तांचे स्पष्टीकरण

googlenewsNext

पिंपरी : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रस्थानवेळी आळंदी येथे पोलिस आणि काही जणांमध्ये वाद झाला. यावेळी पोलिसांनी सौम्य लाठीमार केल्याचा आरोप करण्यात येत होते. मात्र, लाठीमार झालेला नसून किरकोळ झटापट झाल्याचे पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी सांगितले. 

संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे रविवारी (दि. ११) पंढरपूरकडे प्रस्थान झाले. या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आळंदी येथे मंदिरात दिंड्या दाखल झाल्या. त्यावेळी पोलिसांनी काही जणांना थांबवले. त्यावरून वादाचा प्रसंग घडला. याबाबत पोलिस आयुक्त चौबे म्हणाले, पालखी प्रस्थान सोहळा हा दरवर्षी आयोजित होतो. यंदा या सोहळ्यासाठी रविवारी मानाच्या ५६ दिंड्या आल्या होत्या. गेल्यावर्षी चेंगराचेंगरीची स्थिती निर्माण झाली होती आणि त्यावेळी काही महिला जखमी झाल्या होत्या. त्यामुळे यावर्षी प्रधान जिल्हा न्यायाधीश, धर्मादाय आयुक्त, मंदिर प्रमुख विश्वस्त यांच्यासोबत तीन वेळा बैठका घेण्यात आल्या. गेल्या वर्षीसारखी परिस्थिती निर्माण होऊ नये, म्हणून प्रत्येक मानाच्या दिंडीतील प्रत्येकी ७५ जणांना प्रवेश देण्याचा निर्णय या बैठकांमध्ये घेण्यात आला. त्यानुसार नियोजन करण्यात आले. 

एका दिंडीसोबत केवळ ७५ जणांना प्रवेश देण्याचा निर्णय मानाच्या दिंडीप्रमुखांनीही मान्य केला. त्यानुसार प्रत्येक दिंडीला पास वितरित करण्यात आल्या. मुख्य म्हणजे सर्व मानाच्या दिंडी प्रत्येकी ७५ जणांनाच पाठवित होते. मात्र अचानक काही स्थानिक युवकांनी मध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. मंदिर विश्वस्त आणि चोपदार सुद्धा त्यांना समजावण्यासाठी आले. पण ते युवक ऐकत नव्हते. बॅरिकेड्स तोडून त्यांनी आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्या स्थानिकांशी केवळ किरकोळ झटापट झाली, पोलिसांनी लाठीचार्ज किंवा बळाचा वापर केलेला नाही. त्यामुळे लाठीचार्ज केला, हे म्हणणे खोटे आहे. सर्व वारकरी, प्रशासनाला उत्तम सहकार्य करीत आहेत. त्यामुळे महाराष्ट्राची उच्च परंपरा असलेल्या वारीला उगाच गालबोट लावण्याचा प्रयत्न कुणी करू नये, असे आवाहन पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी केले आहे.

Web Title: A minor skirmish not a stick attack Clarification of Police Commissioner of Pimpri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.