Pune Rain: परतीच्या पावसाचा धुमाकूळ; पुणे - नाशिक महामार्ग ठप्प
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2022 09:53 AM2022-10-18T09:53:35+5:302022-10-18T09:54:31+5:30
रात्री अकराच्या सुमारास पडलेल्या जोरदार पावसामुळे शहरातील रस्ते पाण्याखाली
पिंपरी : शहर आणि परिसरात परतीच्या पावसाने पुन्हा एकदा धुमाकुळ घातला. सोमवारी (दि. १७) रात्री अकराच्या सुमारास पडलेल्या जोरदार पावसामुळे शहरातील रस्ते पाण्याखाली गेले. तर वाहत्या पाण्याचा अडथळा निर्माण झाल्याने सर्वच छोट्या-मोठ्या रस्त्यांवर वाहतूकीचा फज्जा उडाला. मंगळवारी पुणे-नाशिक महामार्गावर अक्षरश: वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सकाळी वाहतूक सुरळीतकरण्यासाठी पोलिसांना कसरत करावी लागली. अग्निशमन दलाला पाचारण करून रस्त्यावरील पाण्याला मार्ग केला. त्यानंतर काही तासांनी वाहतूक सुरळीत झाली.
सोमवारी रात्री शहरात ३१.० मिमी पावसाची नोंद झाली. अवघ्या काही मिनीटात रस्त्यांवर पाणी आले. त्यानंतरही पावसाचा वेग कायम राहिल्याने रस्त्यांसह सखल भागात पाणीच पाणी झाले. छोट्या रस्त्यांना नाल्याचे स्वरूप प्राप्त झाले. वाहत्या पाण्यातून मार्ग शोधताना मात्र वाहन चालकांना अक्षरश: तारेवरची कसरत करावी लागली. तर काही मार्गावर अधिक पाणी साचल्याने वाहन चालविणे अशक्य झाले. तर काही वाहने पाण्यात बंद पडली. वरून जोरदार पावसाचा मारा, तर खाली पाणीच पाणी अशा दुहेरी संकटाचा सामना शहरवासीयांना करावा लागला.
अकरा वाजता सुरू झालेल्या जोरदार पावसाचा वेग सुमारे अडीच तासानंतर कमी झाला. मात्र रात्री उशीरापर्यंत पावसाची रिपरिप सुरूच होती. आकाशात ढग कायम होते. पावसामुळे हवेत गारवा पसरला होता. कमाल आणि किमान तापमानातही मोठी घट झाली. शहरात येत्या गुरूवारपर्यंत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कायम असणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
मुसळधार पावसाने पुणे - नाशिक महामार्ग ठप्प #punerains#highway#Trafficpic.twitter.com/MWisvZVsBa
— Lokmat (@lokmat) October 18, 2022
''पुणे- नाशिक महामार्गावर सखल भागात पाणी साचल्याने बंगला वस्ती या ठिकाणी पाणी साचल्यामुळे वाहतूक कोंडी झाली आहे. महापालिका प्रशासनास कळवले आहे. वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी एका लेनवर दुहेरी वाहतूक सुरू केली आहे. - चंद्रशेखर चौरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, मोशी वाहतूक विभाग''