हॉटेलच्या स्वच्छतागृहामध्ये चित्रीकरणासाठी ठेवला मोबाईल; वेटरविरोधात गुन्हा दाखल
By रोशन मोरे | Published: August 21, 2023 03:27 PM2023-08-21T15:27:15+5:302023-08-21T15:40:33+5:30
त्यानुसार पोलिसांनी हॉटेलमधील वेटर ईरण्णा शिवण्णा पांढेर याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.....
पिंपरी : हॉटेलमधील स्वच्छतागृहामध्ये मोबाईल ठेवून चित्रीकरण केले जात होते. हॉटेलमध्ये आलेला एक ग्राहक स्वच्छतागृहात गेल्यानंतर त्याला चित्रीकरण करण्यासाठी ठेवलेला मोबाईल दिसला. हा प्रकार गिता पावभाजी, आकुर्डी येथे रविवारी (दि.२०) उघडकीस आला. या प्रकरणी गौरव प्रकाश सुर्यवंशी (वय २८, रा.आकुर्डी) यांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी हॉटेलमधील वेटर ईरण्णा शिवण्णा पांढेर याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या ऑफीसमधील कर्मचारी आणि मित्रासोबत हॉटलेमध्ये गेले होते. त्यावेळी फिर्यादी यांच्यासोबतचा एक जण फ्रेश होण्यासाठी स्वच्छतागृहामध्ये गेला. त्यावेळी तेथे चित्रिकरणासाठी एका पेपरवर मोबाईल ठेवल्याचे दिसून आले. त्यानंतर फिर्यादी यांनी थेट पोलिस ठाणे गाठत फिर्याद दिली. हा मोबाईल हॉटेलमध्ये काम करणा वेटरचा असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
मिळालेल्या माहिती प्रमाणे, निगडी परिसरा असलेल्या एका प्रसिद्ध हॉटेलच्या स्वच्छतागृहात चित्रिकरण करण्यासाठी मोबाईल ठेवला होता. हे स्वच्छतागृह कॉमन असून महिला आणि पुरूष ग्राहकांकडून त्याचा वापर केला जात होता. एका सजग ग्राहकामुळे स्वच्छतागृहात मोबाईल ठेवल्याचे उघड झाले.
पोलीस निरीक्षक रंगनाथ उडे यांनी सांगितले की, वेटरला ताब्यात घेतले असून दाखल करण्याचे काम सुरू आहे.