भरधाव वाहनाने वाहतूक पोलिसाला उडवले; वाहतूक पोलीस गंभीर जखमी
By नारायण बडगुजर | Published: April 8, 2024 11:29 PM2024-04-08T23:29:53+5:302024-04-08T23:30:01+5:30
यात एक पोलिस उपनिरीक्षक तसेच तीन अंमलदार होते. दरम्यान, दुपारी पावणेबाराच्या सुमारास चऱ्होली गावाकडून एक चारचाकी वाहन भरधाव वेगात आले.
पिंपरी : वाहतूक नियमन करत असलेल्या वाहतूक पोलिसाला भरधाव चारचाकी वाहनाने उडवले. यात वाहतूक पोलीस गंभीर जखमी झाला. चऱ्होली येथे सोमवारी (दि. ८) दुपारी पावणे बाराच्या सुमारास ही घटना घडली.
राहुल मोटे (वय ३०), असे गंभीर जखमी झालेल्या वाहतूक पोलिसाचे नाव आहे. प्रशांत कदम (वय २०), असे गुन्हा दाखल झालेल्या वाहन चालकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल मोटे हे दिघी आळंदी वाहतूक विभागात नियुक्त आहेत. चऱ्होली गावातून अजिंक्य डी. वाय. पाटील महाविद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहतूक पोलिस वाहतूक नियमन करत होते.
यात एक पोलिस उपनिरीक्षक तसेच तीन अंमलदार होते. दरम्यान, दुपारी पावणेबाराच्या सुमारास चऱ्होली गावाकडून एक चारचाकी वाहन भरधाव वेगात आले. या वाहनाला काळ्या काचा होत्या. त्यामुळे पोलिसांनी वाहन थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र चालकाने वाहन दामटले. त्यामुळे पोलिस अंमलदार राहुल मोटे यांनी पुढे होऊन वाहन चालकाला थांबण्याचा इशारा केला. त्यावेळी चालकाने भरधाव चारचाकी राहुल मोटे यांच्या अंगावर घातली. यात राहुल गंभीर जखमी झाले. त्यांना पुणे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी दिघी पोलिस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.