पुणे - नाशिक महामार्गावर टेम्पोची दुचाकीला धडक, दुचाकीस्वाराचा मृत्यू
By प्रकाश गायकर | Published: March 29, 2024 03:26 PM2024-03-29T15:26:54+5:302024-03-29T15:27:11+5:30
टेम्पोचे चाक डोक्यावरून गेल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला
पिंपरी : समोरून जाणाऱ्या दुचाकीला टेम्पोने धडक दिली. त्यामध्ये दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. त्यातच दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. हा अपघात गुरुवारी (दि. २८) सकाळी पुणे-नाशिक महामार्गावर कुरुळी येथे घडला.
उमेश देवानंदसिंग जाधव (वय २५, रा. भोसरी. मूळ रा. बुलढाणा) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी संदीप दोघू चौधरी (४२, रा. भोसरी) यांनी म्हाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार टेम्पो चालक गणेश किसन चोपाडे (२९, रा. चिंबळी फाटा, ता. खेड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चौधरी आणि उमेश जाधव हे एकाच कंपनीत काम करत होते. गुरुवारी सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास जाधव हे पुणे-नाशिक महामार्गावरून जात होते. ते कुरुळी येथे आले असता त्यांच्या पाठीमागून भरधाव आलेल्या एका टेम्पोने जाधव यांच्या दुचाकीला धडक दिली. जाधव हे रस्त्यावर पडले. त्यानंतर टेम्पोचे चाक जाधव यांच्या डोक्यावरून गेल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. म्हाळुंगे एमआयडीसी पोलिस तपास करत आहेत.