उद्योगनगरीत धावतेय ‘झाड’वाली रिक्षा; पिंपरीतील रिक्षाचालक गणेश नानेकर यांचा अनोखा प्रयोग
By ज्ञानेश्वर भंडारे | Published: April 2, 2024 05:59 PM2024-04-02T17:59:39+5:302024-04-02T18:00:40+5:30
वृक्षलागवडीची आवड असणारे नानेकर पोटच्या मुलाप्रमाणे झाडांची काळजी घेत आहेत...
पिंपरी :पिंपरी-चिंचवड शहरातील रस्त्यांवरून फिरणारी एक रिक्षा ऐन उन्हाळ्यात प्रवाशांना सुखद गारवा देत आहे. पूर्ण शहरात ती सध्या चर्चेचा आणि कुतूहलाचा विषय बनली आहे. पिंपरीत राहणाऱ्या गणेश नानेकर यांची ही अनोखी रिक्षा. रिक्षात आतमध्ये देशी-विदेशी झाडांच्या कुंड्या बसविण्यात आल्या आहेत.
वृक्षलागवडीची आवड असणारे नानेकर पोटच्या मुलाप्रमाणे झाडांची काळजी घेत आहेत. दिवसातून तीन वेळा पाणी, आठवड्यातून दोनदा खत देतात. रिक्षामध्ये बसणारे प्रवासीही कुतूहलाने या रिक्षाचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करत आहेत. नानेकर यांनी २५ पेक्षा अधिक कुंड्या रिक्षामध्ये बसविल्या आहेत. या अनोख्या रिक्षाला ‘झाडवाली रिक्षा’ म्हणून ओळखले जाऊ लागले आहे.
पहिला प्रयोग मनी प्लांटचा
आम्हा पती-पत्नीला झाडे लावण्याची आवड आहे. दोन-तीन वर्षांपूर्वी रिक्षामध्ये बाटलीत मनी प्लांट लावला होता. तो पाहून नागरिक उत्स्फूर्त प्रतिक्रिया देत कौतुक करत होते. त्यामुळे रिक्षात झाडे का लावू नयेत, असे वाटले. त्यानुसार रिक्षात कुठली झाडे जगतील, याचा अभ्यास केला. वृक्ष अभ्यासकांनी सांगितल्याप्रमाणे झाडे लावली.
-गणेश नाणेकर, रिक्षाचालक