Pimpri Chinchwad: लिफ्ट मागितली अन् घात झाला, अपघातात दुचाकीवरील महिलेचा मृत्यू
By प्रकाश गायकर | Published: December 29, 2023 07:51 PM2023-12-29T19:51:41+5:302023-12-29T19:51:52+5:30
या अपघातात दुचाकीवर मागे बसलेल्या महिलेचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि. २८) निघोज येथे घडली....
पिंपरी : रात्रीच्या वेळी दुचाकीस्वाराकडे लिफ्ट मागणे एका महिलेच्या जीवावर बेतले. रात्री रस्त्यावर उभ्या असलेल्या एका महिलेने कंपनीतील रात्रपाळी संपवून घरी निघालेल्या एका दुचाकीस्वाराला लिफ्ट मागत घरी सोडविण्याची विनंती केली. त्यानंतर दोघेही दुचाकीवरून जात असताना भरधाव वेगातील एका टेम्पोने त्यांच्या दुचाकीला मागून धडक दिली. या अपघातात दुचाकीवर मागे बसलेल्या महिलेचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि. २८) निघोज येथे घडली.
वर्षा संतोष बसवंते (वय ३३, रा. निघोजे) असे अपघातात मयत झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी महिलेला लिफ्ट देणारे दुचाकीस्वार राजेंद्र शंकर पवार (वय ४०, रा डोंगर वस्ती, खेड ) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, टेम्पो चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांची नाईट शिफ्ट संपवून त्यांच्या दुचाकीवरून घरी जात होते. यावेळी रस्त्यामध्ये वर्षा बसवंते यांनी फिर्यादी यांना हात दाखवून थांबवले. फिर्यादी यांनीही त्यांना लिफ्ट दिली. दोघे दुचाकीवरून डोंगरवस्तीकडे निघाले. दुचाकीवरून जात असताना पाठीमागून आयशर टेम्पोने दुचाकीला जोरात धडक दिली. यात फिर्यादी हे जखमी झाले तर वर्षा यांच्या डोक्याला मार लागून त्यांचा मृत्यू झाला.