जीवावर बेतणारं काम, पण पोटासाठी करावं लागतंय; तळवडेच्या आगीत माय-लेकींचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2023 11:24 AM2023-12-11T11:24:46+5:302023-12-11T11:25:06+5:30
मायलेकी दुर्घटनेच्या दिवशी सुट्टी घेणार होत्या, पण कामावर गेल्या अन् अघटित घडले
पिंपरी : ‘‘काम जीवावर बेतणारं आहे. पण पोटासाठी करावं लागतंय. एवढ्या लांबून पोटापाण्यासाठी आलोय, तर त्यासाठी काम तर करावंच लागेल ना? ही खंत शिल्पा राठोड बोलून दाखवायच्या. ती बोलली ते एक दिवस खरं होईल, असं कोणालाही वाटलं नव्हतं...’’ हे शब्द आहेत तळवडेतील स्पार्कल कँडल कारखान्यात लागलेल्या आगीत भक्ष्यस्थानी सापडलेल्या शिल्पा राठोड यांच्या शेजाऱ्यांचे. आई कविता राठोड यांच्या मृत्यूनंतर दुसऱ्याच दिवशी शिल्पा यांचा मृत्यू झाला. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
शिल्पा आणि त्यांच्या आई कविता राठोड मूळच्या यवतमाळ जिल्ह्यातील धानोरा गावच्या. त्यांचे कुटुंब तीस वर्षापूर्वी कामधंद्यानिमित्त पिंपरी-चिंचवडमध्ये आले. सुरुवातीला मोलमजुरी करत उदरनिर्वाह केला. निगडीतील रूपीनगर येथे अर्धा गुंठा जागा घेऊन तिथे स्थायिक झाले होते. दोन वर्षांपासून शिल्पा स्पार्कल कँडलच्या कंपनीत कामाला जात होत्या. त्यांची आई कविता यांना एक वर्षे झाले होते.
अपूर्ण शिक्षणामुळे मोलमजुरी...
शिल्पा यांचे लग्न झाल्यानंतर काही दिवसांतच घटस्फोट झाला. त्यामुळे त्या माहेरी आई-वडिलांकडेच राहत असत. त्यातही त्या स्वत:च्या पायावर उभे राहत आर्थिक स्वावलंबनासाठी प्रयत्न करत होत्या. पदवीचे शिक्षण अर्धवट झाले होते. त्यामुळे त्यांना असे कमी पगारावर काम करावे लागायचे. त्यांना १२ वर्षाचा मुलगाही आहे. तो पतीकडे राहत असल्याने त्यांचे फक्त फोनवर बोलणे व्हायचे.
त्या दिवशी कामावर जायला नको...
शुक्रवारी सकाळी कामावर जायला शिल्पा नको म्हणत होती. आज सुटी घेऊया म्हणत होती. मात्र, आई कविता यांनी एक दिवस सुट्टी घेऊन काय करायचे, म्हणत दोघीही मायलेकी कामावर गेल्या आणि अघटित घडले. आमच्या सगळ्या कुटुंबाचे खूप मोठे नुकसान झाले. - संगीता चव्हाण, शिल्पाची मामी
त्यांचा सर्वांना लळा लागला होता
शिल्पा आणि तिची आई कविता या दोघीही खूप शांत स्वभावाच्या होत्या. प्रतिकूल परिस्थितीमुळे उदरनिर्वाह चालविण्यासाठी त्या कामाला जायच्या. चांगल्या स्वभावामुळे त्यांचा सर्वांना लळा लागला होता. - कुसुम पाडुळे, शेजारी