हॉटेलच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारल्याने तरुणाचा मृत्यू
By नारायण बडगुजर | Published: July 26, 2022 10:31 PM2022-07-26T22:31:24+5:302022-07-26T22:31:33+5:30
हॉटेलमध्ये दोघांना बेदम मारहाण केली. त्यामुळे भीतीने हॉटेलच्या लॉबीमधून तरुणाने दुसऱ्या मजल्यावरून उडी मारली.
पिंपरी :
हॉटेलमध्ये दोघांना बेदम मारहाण केली. त्यामुळे भीतीने हॉटेलच्या लॉबीमधून तरुणाने दुसऱ्या मजल्यावरून उडी मारली. त्यात गंभीर झाल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि. २५) रात्री भुजबळ चौक, वाकड येथील द बार हिस्ट हॉटेलमध्ये घडली.
अभय मनोज गोंडाणे (वय २१, रा. विश्रांतवाडी, पुणे) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी मनोजकुमार बापूसो गोईलकर (वय २४, रा. विश्रांतवाडी, पुणे. मूळ रा. सांगली) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार बार हिस्ट हॉटेलचे मालक, मालकीण, बाउन्सर, बार टेंडर, डीजे, मॅनेजर गजानन खरात यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचा मित्र अभय गोंडाणे हे दोघे भुजबळ चौक वाकड येथील द बार हिस्ट हॉटेलमध्ये आले. त्यावेळी किरकोळ वाद झाला. त्यामुळे हॉटेल मालक, मालकीण, बाउन्सर, बार टेंडर, डीजे, मॅनेजर यांनी फिर्यादी आणि अभय यांना हॉटेलच्या बाहेर हुसकावले. त्यानंतर अभयने हॉटेलमध्ये जाऊन हॉटेल मालक, मालकीण आणि मॅनेजरला याचा जाब विचारला. त्यावरून आरोपींनी फिर्यादी आणि त्यांचा मित्र अभय यांना खुर्च्या, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यांच्या माराला घाबरून अभय हॉटेलच्या दुसऱ्या मजल्यावरील लॉबीमध्ये आले. बाहेर पडण्यासाठी जागा नसल्याने दुसऱ्या मजल्यावरून अभयने खाली उडी मारली. त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी थेरगाव येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथून त्यांना ससून रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा ससून रुग्णालयात मृत्यू झाला. यात फिर्यादी देखील जखमी झाले.