स्मार्ट सिटीची स्वच्छतेत पिछाडी, अभियानाचा उडाला बोजवारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2019 02:55 AM2019-03-10T02:55:35+5:302019-03-10T02:55:47+5:30

नागरिकांचा अल्प प्रतिसाद; महापालिकेच्या घंटागाडीची अनियमित हजेरी

Abandonment of cleanliness in smart city, drive off mission | स्मार्ट सिटीची स्वच्छतेत पिछाडी, अभियानाचा उडाला बोजवारा

स्मार्ट सिटीची स्वच्छतेत पिछाडी, अभियानाचा उडाला बोजवारा

Next

दिघी : शासनाच्या नागरी स्वच्छता अभियानांतर्गत स्वच्छता सर्वेक्षण २०१८ हे अभियान पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात राबविले. त्याचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. श्रीमंत महापालिका असा लौकिक मिळविलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेने स्वच्छता उपक्रमात १३ वे स्थान मिळविले आहे. स्वच्छता अभियानात स्मार्ट सिटी पिछाडीवर गेली आहे.

स्वच्छता अभियानांतर्गत ओला व सुका कचरा वेगळा करण्यासाठी महापालिकेकडून घरोघरी प्लॅस्टिक बादल्या वाटप करण्यात आल्या. ओला व सुका कचरा घरातून वेगळा करून तो बादल्यांमध्ये जमा करण्याच्या सूचना नागरिकांना दिल्या. घंटागाडी येताच नागरिकांनी सोसायटीजवळ जमा केलेला ओला व सुका कचरा घंटागाडीवाल्यांकडे द्यायचा, अशी कचरा जमा करण्याची पद्धती अवलंबली होती.
परिसरातील बसथांबे, सोसायट्या, उपनगरांतील नागरी वस्त्यांमध्ये पालिकेने कुंड्या ठेवल्या आहेत. ओला-सुका कचरा कुंड्या मिश्र स्वरूपाच्या कचऱ्याने ओसांडून वाहत असल्याचे सर्वत्र आढळून येत आहे. शिवाय पालिकेकडून नागरिकांना वाटलेल्या ओला व सुका कचरा वेगळा करण्यासाठीच्या प्लॅस्टिक कचरा कुंडीचा वापरच होत नसल्याचे वास्तव समोर आले आहे.

पाणीपुरीवाले, चायनीज सेंटर, भाजी विक्रेते, मंगल कार्यालये, पानटपऱ्या येथून निर्माण होणारा कचरा एकत्रित केला जात आहे.
उष्टे अन्न, शिळे अन्न, कागदी, थर्माकॉल, प्लॅस्टिक पत्रावळी, पेपर डिश, सडक्या पालेभाज्या, फळे, प्लॅस्टिक बाटल्या, आईस्क्रीमचे रिकामे डबे, कागद, काच अशा कचºयाचा मोकळ्या मैदानात ठिकठिकाणी ढीग लागल्याचे चित्र दिसून येते.

घरोघरचा जमा होणारा कचरा घेण्यासाठी येणारी महापालिका सफाई कामगारांची घंटागाडी नियमित येत नाही. घंटागाडीत नेहमीच दोन-तीन कर्मचारी असतात. नागरिकांनी टाकलेला मिश्र कचरा वेगळा करीत असतात. घरातील कचरा जमा करताना नागरिक ओला व सुका कचरा वेगळा न करता सर्रासपणे एकाच कचराकुंडीत जमा करीत आहेत. वास्तविक पालिकेने ओला कचरा जमा करण्यासाठी हिरवी व सुका कचरा जमा करण्यासाठी पांढरी प्लॅस्टिक बादली दिली आहे.

कचºयाचे वर्गीकरण करण्याच्या उद्देशाने रहिवाशांना प्लॅस्टिक कचराकुंडीचे वाटप करण्यात आले होते. या कुंडीचा वापर करून नागरिकांचा स्वच्छता अभियानांतर्गत सहभाग वाढावा, असा महापालिकेचा उद्देश होता. मात्र नागरिकांमध्ये योग्य प्रकारे जनजागृती झाली नसल्याने प्रतिसाद मिळत नाही. परिणामी स्वच्छता अभियानाचा बोजवारा उडाला आहे.

स्वच्छतागृहांचा अभाव
परिसरात नवीन झालेली स्वच्छतागृहे नियमितपणे स्वच्छ होत नसल्याने दुर्गंधीची ठिकाणे बनली आहेत. त्यामुळे स्वच्छतागृहांचा वापर होताना दिसत नाही. स्वच्छतागृहांची नियमित साफसफाई व्हावी, अशी नागरिकांना अपेक्षा आहे. परिसरातील उपनगरात मोठ्या गृहनिर्माण सोसायट्या आहेत. या सोसायट्यांतून निघणारा कचरा मोठ्या प्रमाणात आहे.
यामध्ये काही सोसायट्यांनी कचºयाची विल्हेवाट लावण्याची यंत्रणा विकसित केली आहे. कचरा विल्हेवाटीची यंत्रणा राबविण्यासाठी बोटावर मोजण्याइतपत सोसायट्या पुढे आल्या. सोसायट्यांचा प्रतिसाद अल्प प्रमाणात मिळाल्याने या वर्षीच्या महापालिकेच्या स्वच्छता गुणांकनामध्ये घसरण झाल्याबद्दल बोलले जात आहे.

ओला आणि सुका कचरा यातील फरक
शिळे अन्नपदार्थ, तसेच पालेभाज्या याचा समावेश ओला कचºयामध्ये होतो; तर कागद, पुठ्ठा, थर्माकोल, प्लॅस्टिक पिशव्या याचा सुका कचरा यामध्ये समावेश होतो. मात्र कोणीही असा कचरा विलगीकरण करण्याची तसदी घेत नाही.
घराघरांतून निर्माण होणारा कचरा वर्गीकरण होऊन बाहेर पडत नसल्याने घंटागाडी कर्मचाऱ्यांना कचरा जमा करताना, कचºयाचे विलगीकरण करण्यात अधिक वेळ द्यावा लागतो आहे. त्यामुळे कचरा विल्हेवाट लावण्याच्या यंत्रणेत अनेक अडथळे निर्माण होत आहेत.

Web Title: Abandonment of cleanliness in smart city, drive off mission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.