शंभरहून अधिक CCTV पाहून अपहृत बालकाचा २३ तासांत शोध; बाळ आईच्या कुशीत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2022 06:32 PM2022-12-29T18:32:29+5:302022-12-29T18:42:47+5:30
हे दाम्पत्य सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथून उदरनिर्वाहासाठी तीन वर्षांपूर्वी पुण्यात आले
- नारायण बडगुजर
पिंपरी : सिग्नलवर वस्तू विक्री करणाऱ्या दाम्पत्याच्या बालकाचे एका महिलेने अपहरण केले. पोलिसांनी २३ तासांमध्ये शोध घेऊन मुलाला त्याच्या आई-वडीलांच्या ताब्यात दिले. पिंपरी पोलिसांनी ही कामगिरी केली. रवी सुनील पवार व राधा पवार हे दाम्पत्य सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथून उदरनिर्वाहासाठी तीन वर्षांपूर्वी पुण्यात आले.
पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे साहित्य विक्री करीत होते. मंगळवारी (दि. २७) नेहमीप्रमाणे तीन मुलांना सोबत घेऊन पवार दाम्पत्य वस्तू विक्री करीत होते. दुपारी सव्वादोनच्या सुमारास रवी पवार हे चौकातील झाडांच्या कुंड्यांलगत मुलांना बसवून वडापाव आणण्यासाठी गेले. त्यावेळी त्यांची पत्नी सिग्नलवर वस्तू विक्री करीत होती. दहा मिनिटांमध्ये रवी पवार परत आले असता त्यांना त्यांचा मुलगा राहुल तिथे नसल्याचे लक्षात आले. पवार दाम्पत्याने परिसरात शोध घेतला असता मुलगा मिळून आला नाही. त्यामुळे त्यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात धाव घेतली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक आवताडे यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून गुन्हा नोंदविला. पिंपरी पोलीस, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष, गुन्हे शाखा युनिट - २ यांची स्वतंत्र पथकांनी तपास सुरू केला.
तोंडाला स्कार्फ बांधलेली एक महिला मुलाला घेऊन जात असल्याचे सीसीटिव्ही फुटेजमध्ये दिसून आले. आरोपी महिलेचा माग काढण्यासाठी पोलिसांनी शंभरहून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजची पाहणी केली. आरोपी महिलेने मुलाला शिरगाव येथील प्रतिशिर्डी साईबाबा मंदिरात सोडून दिल्याचे बुधवारी रात्री समजले. पिंपरी पोलिसांचे पथक शिरगाव येथे गेले. अपहरण झालेल्या मुलाला ताब्यात घेऊन फिर्यादीकडे खात्री करून दिले. आरोपी महिलेचा शोध सुरू आहे.
सहायक आयुक्त प्रेरणा कट्टे, डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शंकर आवताडे, तपास पथकाचे अधिकारी व कर्मचारी तसेच अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षचे पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, उपनरीक्षक प्रदीपसिंग सिसोदे, गुन्हे शाखा युनिट दोन तसेच शिरगाव पोलीस चौकीचे अधिकारी व अंमलदार यांच्या पथकाने ही कामगिरी केली.