चारित्र्य संशयावरून पतीने केलेल्या मारहाणीत पत्नीचा गर्भपात; पती, सासू, नणंदविरोधात गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 06:41 PM2021-03-04T18:41:39+5:302021-03-04T18:46:13+5:30
तुझ्या घरच्यांनी लग्नामध्ये आमचा मान-सन्मान केला नाही..
पिंपरी : लग्नात मान-सन्मान दिला नाही म्हणून विवाहितेचा छळ केला. तसेच चारित्र्यावर संशय घेऊन पतीने मारहाण केली. यात तिचा गर्भपात झाला. पोलिसांत तक्रार दिली तर पाहून घेऊ, अशी धमकीही दिली. याप्रकरणी सासरच्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. वेताळनगर येथे सप्टेंबर २०२० ते ३ मार्च २०२१ दरम्यान हा प्रकार घडला.
पीडित विवाहितेने याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती, सासू आणि नणंद यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुझ्या घरच्यांनी लग्नामध्ये आमचा मान-सन्मान केला नाही, असे म्हणून आरोपींनी पीडित विवाहितेला शिवीगाळ व मारहाण केली. तसेच क्रूर वागणूक देऊन, आर्थिक पिळवणूक करून मानसिक व शारीरिक छळ केला. आरोपी पती हा १२ फेब्रुवारी २०२१ रोजी एका महिलेला सोबत घेऊन आला. या महिलेला मी घरात घेणार आहे, असे आरोपी पती म्हणाला. त्याला फिर्यादी विवाहितेने विरोध केला. त्यावरून आरोपी पतीने त्यांना मारहाण केली. तसेच आरोपी सासू व नणंद यांनी शिवीगाळ केली.
आरोपी पतीने फिर्यादीच्या चारित्र्यावर संशय घेतला. तुझ्या पोटातील बाळ माझे नाही, असे म्हणून फिर्यादीच्या पोटावर जोरात लाथ मारली. तसेच सासू व नणंद यांनीही शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तू जर आमच्या विरोधात पोलिसांत तक्रार दिली तर तुला व तुझ्या घरच्यांना पाहून घेईन, अशी धमकी आरोपी पतीने फिर्यादी यांना दिली. फिर्यादी विवाहिता गर्भवती असल्याचे माहीत असतानाही आरोपी यांनी फिर्यादी यांना मारहाण केली. त्यामुळे फिर्यादी यांचा गर्भपात झाला, असे फिर्यादीत नमूद केले आहे.