मावळात अवकाळीची दमदार हजेरी
By admin | Published: May 13, 2017 04:36 AM2017-05-13T04:36:38+5:302017-05-13T04:36:38+5:30
तळेगाव शहर परिसरात शुक्रवारी सायंकाळी वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
तळेगाव दाभाडे : तळेगाव शहर परिसरात शुक्रवारी सायंकाळी वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या.
साडेसहाच्या सुमारास सोसाट्याचा वारा सुटला. यामध्ये कडोलकर कॉलनी भागात एक वृक्ष रस्त्यावर उन्मळून पडला. यामुळे विजेच्या तारा तुटल्या. सातच्या सुमारास शहर परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला.संपूर्ण शहर अंधारात बुडाल्याने जनजीवन विस्कळीत झाले. बाजारपेठेसह सर्वच व्यवहार ठप्प झाले. शहर परिसरातील अनेक कार्यालयातील व-हाडी मंडळींना या वादळी पावसाचा जोरदार फटका बसला. विट उत्पादक शेतकरी व मेढपाळ यांची धावपळ झाली. सगळीकडे पाणीच पाणी झाले. ग्रामिण भागातही वादळी पाऊस झाल्याने अने ठिकाणी घरावरील पत्रे उडून गेले. रात्री उशिरापर्यंत वीज पुरवठा सुरू होऊ शकला नाही.
वादळी पावसाने तालुक्याच्या पूर्व भागातील तळेगाव दाभाडे, माळवाडी,कोटेश्वरवाडी, इंदोरी, कुंडमळा, सुदुंबरे, सुदवडी, जांबवडे , नवलाख उंबरे या गावांच्या शिवारातील उन्हाळी बाजरी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. वादळी पावसाने बाजरीचे उभे पीक शेतात आडवे झाल्याने मोठे नुकसान झाले असल्याची माहिती इंदोरी येथील प्रगतिशील शेतकरी अजय काशिद पाटील यांनी दिली.
वडगाव मावळ : वडगाव मावळ परिसरात मेघगर्जनेसह सायंकाळी सहानंतर पावसाला सुरुवात झाली. विवाह सोहळ्यातील वऱ्हाडी मंडळींची पळापळ झाली. जनावरांचा साठवून ठेवलेल्या चारा भिजू नये म्हणून झाकून ठेवण्यासाठी शेतकऱ्यांची धांदल उडाली. अवकाळी पाऊस व ढगाळ वातावरणामुळे आंब्याचे तसेच शेतीचे नुकसान होण्याची दाट शक्यता आहे.