आरोपीच्या जामिनासाठी पोलीस उपनिरीक्षकाला शिवीगाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 04:46 PM2018-05-18T16:46:23+5:302018-05-18T16:46:23+5:30
मारहाणीच्या गुन्ह्यांमध्ये अटक असलेल्या आरोपीला जामीन मिळावा म्हणून त्याच्या आईने पोलीस चौकीत अधिकाऱ्याला शिवीगाळ केली अंगावर धावून गेली
पिंपरी-चिंचवड (वाकड) : मारहाणीच्या गुन्ह्यांमध्ये अटक असलेल्या आरोपीला जामीन मिळावा म्हणून त्याच्या आईने पोलीस चौकीत अधिकाऱ्याला शिवीगाळ केली अंगावर धावून गेली. तर एका पुढाऱ्याने अधिकाऱ्यास थेट पोलीस आयुक्तांकडे पैसे घेतल्याची तक्रार देण्याची धमकी दिली. ही घटना बुधवारी (दि १६) सायंकाळी थेरगाव पोलिस चौकीत घडली. शीला रमेश तिवारी (रा. पिंपळे सौदागर) आणि नंदू बारणे (रा. थेरगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस उपनिरीक्षक रमेश केंगार यांनी गुरुवारी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शीला यांचा मुलगा मारहाण करून गंभीर दुखापत करण्याच्या गुन्ह्यामध्ये अटक असून सध्या तो तुरुंगात आहे. त्याला जामीन मिळण्यासाठी पोलिसांचा अभिप्राय (आयवोटूसे) आवश्यक असतो. हा अभिप्राय तुम्ही का देत नाही, त्याचा जामीन झालाच पाहिजे, असे म्हणत शीला यांनी थेरगाव पोलीस चौकीतच पोलिस अधिकाऱ्याला शिवीगाळ करीत त्यांच्या अंगावर धावून गेल्या. त्यानंतर नंदू बारणे याने फिर्यादी पोलीस अधिकारी केंगार यांना फोन करून तुम्ही आरोपीकडून दहा हजार रुपये घेता आणि जामिनासाठी अभिप्राय देत नाहीत, असे म्हणत तुमची पोलिस आयुक्तांकडे तक्रार करतो, अशी धमकी दिली. सहायक निरीक्षक महेश स्वामी याबाबत अधिक तपास करत आहेत.