Pimpri Chinchwad Crime: तरुणीच्या घरासमोर जाऊन शिवीगाळ केली अन् मिळाली नोटीस
By नारायण बडगुजर | Updated: March 30, 2023 18:52 IST2023-03-30T18:48:21+5:302023-03-30T18:52:29+5:30
याप्रकरणी पोलिसांनी तरुणाला नोटीस दिली...

Pimpri Chinchwad Crime: तरुणीच्या घरासमोर जाऊन शिवीगाळ केली अन् मिळाली नोटीस
पिंपरी : तरुणीच्या घरासमोर जाऊन तरुणाने शिवीगाळ केली. याप्रकरणी पोलिसांनी तरुणाला नोटीस दिली. वाकड येथील भुजबळ वस्ती येथे मंगळवारी (दि. २८) रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली.
या प्रकरणी १८ वर्षीय तरुणीने बुधवारी (दि. २९) हिंजवडीपोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, शुभम अनिल पारखी (वय २२, रा. माणगाव, ता. मुळशी) याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तसेच त्याला पोलिसांकडून सीआरपीसी ४१ (१)(अ) प्रमाणे नोटीस बजावली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी आणि त्यांची आजी घरी असताना आरोपी हा फिर्यादी यांच्या घराजवळ गेला. त्याने फिर्यादी तरुणीला घराबाहेर बोलविले. मात्र, आरोपी दारू पिऊन आल्याचे वाटल्याने फिर्यादी तरुणी बाहेर गेली नाही. त्यामुळे चिडलेल्या आरोपीने मोठमोठ्याने ओरडत शिवीगाळ केली. आजूबाजूच्या लोकांना ऐकू जाईल अशा प्रकारे त्याने फिर्यादी तरुणीला अश्लील शिवीगाळ केली. त्यामुळे फिर्यादी तरुणीच्या मनास लज्जा उत्पन्न होऊन विनयभंग होईल असे कृत्य केले. तसेच फिर्यादी तरुणीच्या एकांतपणाचा भंग केला, असे फिर्यादीत नमूद आहे.