खडकी कॅन्टोन्मेंटकडून प्रवेशकर रद्द
By admin | Published: July 4, 2017 03:37 AM2017-07-04T03:37:30+5:302017-07-04T03:37:30+5:30
केंद्र सरकारने देशभर एक जुलैपासून जीएसटी लागू केली आहे. खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डनेही ३० जूनच्या मध्यरात्रीपासून सर्वात मोठे
लोकमत न्यूज नेटवर्क
खडकी : केंद्र सरकारने देशभर एक जुलैपासून जीएसटी लागू केली आहे. खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डनेही ३० जूनच्या मध्यरात्रीपासून सर्वात मोठे उत्पनाचे स्रोत असलेला वाहन प्रवेशकर बंद केला आहे.
कॅन्टोन्मेंट बोर्ड काहीसा संभ्रमात आहे. प्रवेश कराला जीएसटी लागू होते का, असा प्रश्न कॅन्टोन्मेंटपुढे असल्याने बोर्डाच्या सर्वसाधारण सभेत अध्यक्षांनी वरिष्ठांच्या सल्ल्यासाठी प्रवेश कर संकलन नाके तडकाफडकी बंद करण्याचे आदेश देऊन सर्व नाके बंद केले. मात्र बोर्डाकडे उत्पन्नाचे दुसरे साधन नाही.
खडकी बोर्डाला पूर्वी जकातीच्या माध्यमातून १८ कोटी रुपये महापालिकेकडून मिळत होते. २०१३ साली एलबीटी अस्तित्वात आल्यामुळे खडकी कॅन्टोन्मेंट एलबीटीच्या निकषांमध्ये बसत नसल्याने बोर्डाला १८ कोटींवर हात धुवावे लागले. जकात, एलबीटी बंद झाली. २०१० साली बोर्डाने वाहन प्रवेशकर सुरु केला. सुरुवातीला ३ कोटींच्या निविदेवर बोर्डाने ठेका पद्धतीने प्रवेशकर सुरु केला.
२०१० ते २०१७ पर्यंत निरंतर खडकीत प्रवेशकर सुरु होता. तीन कोटींवरून साडेदहा कोटींपर्यंत निविदा काढून ठेकेदारांमार्फत प्रवेशकर संकलन सुरू होते. तत्कालीन सीईओ के. जे. एस. चव्हाण यांनी खडकीतील प्रॉपर्टी टॅक्स दुपटीने वाढवला. त्यामुळे मध्यंतरीच्या काळात बोडार्ला ‘अच्छे दिन’ आले होते. मात्र जीएसटी लागू होताच बोर्डाला आता आर्थिक चक्रव्यूहात अडकण्याची भीती जाणवू लागली आहे. कर्मचाऱ्यांचे वेतन करण्यासाठी बोर्डाने याआधी त्यांच्या ठेवीही मोडल्या आहेत. लवकरात लवकर निर्णय घेऊन प्रवेशकर परत सुरू व्हावा, याकरिता बोर्ड पूर्ण काळजी घेत आहे.
स्मार्ट कॅन्टोन्मेंट स्वप्नच राहणार का?
खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाला प्रवेश कराच्या माध्यमातून आठवड्याला साधारण २० लाख रुपये मिळत होते. हे २० लाख रुपये बंद झाल्यामुळे बोर्डाच्या तिजोरीत खडखडाट जाणवू लागला आहे. बोर्डाने आताच कुठे खडकीच्या विकासाची कामे सुरू केली आहे. ही कामे पूर्ण होणार का, कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर होईल का, खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड खरोखर स्मार्ट होणार का, हॉकीचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या खडकीत ‘अॅस्ट्रोटर्फ हॉकी स्टेडियम’ होईल का, खडकीच्या खेळाडूंना न्याय मिळेल का, असे अनेक प्रश्न सध्या आ वासून उभे आहेत.