पिंपरी चिंचवडमध्ये भरधाव वाहनांमुळे अपघात; पादचाऱ्यासह चार जण जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 06:00 PM2021-03-10T18:00:45+5:302021-03-10T18:09:09+5:30
वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष
पिंपरी : वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करून तसेच भरधाव वाहने चालवल्याने अपघात झाल्याचे प्रकार समोर आले आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या चार वेगवेगळ्या अपघातांमध्ये चार जण जखमी झाले. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मारियान झेवियर नरोन्हा (वय ५२, रा. प्राधिकरण निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. सोमवारी (दि. ८) फिर्यादी आणि त्यांच्या पत्नी घराजवळ शतपावली करत होते. त्यावेळी भरधाव वेगात आलेल्या एका चारचाकी वाहनाने फिर्यादी यांना धडक दिली. यात त्यांना गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर चारचाकी चालक अपघाताच्या ठिकाणी न थांबता निघून गेला.
गायत्री पुरुषोत्तम फडके (वय ५४, रा. संत तुकाराम नगर, पिंपरी) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चारचाकी वाहनाच्या अनोळखी चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी रविवारी (दि. ७) त्यांच्या दुचाकीवरून रावेत येथे जात होत्या. त्यावेळी वाल्हेकरवाडी येथे आरोपीच्या भरधाव चारचाकी वाहनाची फिर्यादीच्या दुचाकीला धडक बसली. यात फिर्यादी जखमी झाल्या. अपघातानंतर आरोपी घटनास्थळी न थांबता निघून गेला.
अश्विन सुधीर चव्हाण (वय २४, रा. हुतात्मा चाैक, प्राधिरकण) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी शनिवारी (दि. ६) त्यांच्या दुचाकीवरून तळवडे चाैकाकडून निगडीकडे जात होते. त्यावेळी अज्ञात चारचाकी वाहनाची फिर्यादीच्या दुचाकीला धडक बसली. यात फिर्यादी जखमी होऊन त्यांच्या दुचाकीचे नुकसान झाले.
रिक्षातून पडल्याने मुलगी जखमी
रिक्षातून चक्कर मारताना रस्त्यावर पडून पाच वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाली. चक्रपाणी वसाहत भोसरी येथे मंगळवारी (दि. ९) हा अपघात झाला. सुदर्शन ग्यानोबा भालेराव (वय ३४, रा चक्रपाणी वसाहत, भोसरी) असे गुन्हा दाखल झालेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे. अमोल अशोक जावळे (वय ३२, रा. फुलेनगर, भोसरी) यांनी याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी यांची मुलगी दिव्या (वय ५) असे जखमी मुलीचे नाव आहे.