मद्यपीचा थरार ! प्रवासी वाहन चालवत दुचाकींना दिली धडक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2019 12:06 PM2019-01-21T12:06:59+5:302019-01-21T12:10:24+5:30
मद्यपीने प्रवासी वाहन चालवत इतर वाहने आणि दुकानांना धडक दिल्याने कामशेत परिसरात दहशत निर्माण झाली हाेती.
कामशेत : येथील छत्रपती संभाजी महाराज चौकात एका गल्लीत लावलेल्या प्रवासी वाहनामध्ये मद्यपी बसला होता. गाडी भरण्यास अवकाश असल्याने गाडीचा चालक काही समान आणण्यासाठी गाडीबाहेर पडला. गाडीत बसलेल्या मद्यपीने चालकाची जागा घेत गाडी सुरु केली. आणि एकाच थरार. मद्यपीने नाणे राेडवरील दाेन दुचाकी आणि काही दुकानांना धडक दिली. यात दुचाकींचे आणि दुकानांचे नुकसान झाले. ही घटना रविवारी दुपारच्या सुमारास घडली. पाेलिसांनी मद्यपीला अटक केली.
प्रत्यक्षदर्शी नागरिकांच्या माहितीनुसार, रविवार ( दि. २० ) रोजी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास छत्रपती संभाजी महाराज चौक येथील नाणे रोड वर दत्त कॉलनी बाजूकडील एका गल्लीत प्रवासी वाहतूक करणारी जीपगाडी प्रवासी भरण्यासाठी थांबली हाेती. गाडीच्या आत मद्यपी सोमनाथ सुभाष लोहट ( वय २२, रा. साई वाउंड, नाणे मावळ ) व तीन प्रवासी बसले होते. जीप चालक गाडी अजून भरली नाही म्हणून सामान खरेदीसाठी बाहेर पडला. इतक्यात मद्यपीने जीपच्या स्टेरिंग सीटवर बसून चावी सुरु करीत जोरात गाडी पुढे घेतली. यात समोर उभ्या दोन दुचाकींना धडक देऊन दुकानाला धडक दिली. पुढे हि जीप नाणे रोड वर येऊन एका दुकानात शिरणार इतक्यात त्या मद्यपीने स्टेरिंग फिरवून गाडीने वळण घेत समोर असलेल्या दोन दुचाकींना धडक दिली व पुढे जाऊन दोन टपऱ्यांना धडकून थांबली. यावेळी एक वृद्ध महिला या दुकानाच्या बाजूला उभी असल्याने ती यात अडकली. आजूबाजूच्या नागरिकांनी प्रसंगावधान दाखवत वृद्ध महिलेला बाजूला काढून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तर मद्यपीला वाहनाच्या बाहेर काढून चांगला चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी घटनास्थळी येवून पाहणी केली असून पुढील कारवाई सुरु आहे. या अपघातात सुमारे तीन ते चार जण जखमी झाले आहेत.