निगडी, वाकड, भोसरीत तीन भीषण अपघात; सात जण जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 11:38 AM2021-09-25T11:38:34+5:302021-09-25T11:44:11+5:30
गवळी माथा ते क्वालिटी सर्कलच्या मध्ये भोसरी टेल्को रस्त्यावर एका रिक्षाने दुसऱ्या रिक्षाला जोरात धडक दिली. त्यामध्ये रिक्षात बसलेले पाच जण जखमी झाले. तर एकाचा पाय फॅक्चर झाला
पिंपरी : निगडी, वाकड आणि एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन अपघात झाले. यामध्ये सात जण जखमी झाले. याप्रकरणी गुरुवारी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. दारूच्या नशेत वाहन चालवून मोटारीला जोरात धडक दिली. त्यामध्ये मोटारीचे नुकसान झाले. कारचालक महिलेला मुका मार लागला. ही घटना बुधवारी दुपारी पाच वाजेच्या सुमारास हुतात्मा चौक, आकुर्डी येथे घडली. वृषाली योगेश भालेराव (वय ४१, रा. थेरगाव) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कारचालक नारायण दिवाकर वैद्य (वय ४०, रा. रावेत, किवळे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काळेवाडी येथे मोपेडला दुचाकीने धडक दिली. यामध्ये मोपेडचालक जखमी झाला. हा अपघात बुधवारी रात्री दहाच्या सुमारास घडला. याप्रकरणी नीलेश आनंद राठोड (वय ३९, रा. काळेवाडी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गवळी माथा ते क्वालिटी सर्कलच्या मध्ये भोसरी टेल्को रस्त्यावर एका रिक्षाने दुसऱ्या रिक्षाला जोरात धडक दिली. त्यामध्ये रिक्षात बसलेले पाच जण जखमी झाले. तर एकाचा पाय फॅक्चर झाला. ही घटना गुरुवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. याप्रकरणी रामराज श्रीरामप्रसाद पटेल (वय ५०, रा. भोसरी. मूळ रा. उत्तर प्रदेश) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रिक्षा चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.