Pune Helicopter Crash: हिंजवडी पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद; आता ‘डीजीसीए’ च्या अहवालाची प्रतीक्षा
By नारायण बडगुजर | Updated: October 2, 2024 16:51 IST2024-10-02T16:49:01+5:302024-10-02T16:51:20+5:30
डीजीसीए अहवालात हा अपघात कसा झाला, अपघातामागची नक्की कारणे काय, हे सर्व असणार

Pune Helicopter Crash: हिंजवडी पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद; आता ‘डीजीसीए’ च्या अहवालाची प्रतीक्षा
पिंपरी : बावधन येथे हेलिकॉप्टर कोसळून तीन जणांचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि. २) सकाळी साडेसातच्या सुमारास घडली. दरम्यान, हा अपघात का व कसा झाला, या संदर्भात नागरी हवाई वाहतूक महासंचालनालय (डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन - डीजीसीए) आपला अहवाल सादर करणार आहे. हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर हिंजवडी पोलिसांकडून पुढील कारवाई करण्यात येणार आहे. या अपघातानंतर हिंजवडी पोलिसांनी तीन लोकांची अपघाती मृत्यू नोंद केली आहे.
बावधन येथे हेलिकॉप्टर कोसळून हेलिकॉप्टरमधील दोन पायलट आणि अन्य एका व्यक्तीचा मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच हिंजवडी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाची पाहणी करून कोणी जखमी आहे का, कोणाचा मृत्यू झाला आहे का, याची शहानिशा केली. त्यानंतर अग्निशमन दलाला माहिती कळवून आगीचे बंब मागविण्यात आहे. १०८ क्रमांकावर संपर्क करून रुग्णवाहिका मागवून मृतदेहांना रुग्णालयात पाठविण्यात आले. दरम्यान, या घटनेबाबत डीजीसीए अहवाल देणार आहे. हा अपघात कसा झाला, अपघातामागची नक्की कारणे काय, हे सर्व या अहवालात असणार आहे. हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर हिंजवडी पोलिस पुढील कारवाई करणार आहे. सध्या हेलिकॉप्टर अपघातात तीन जणांचा अपघाती मृत्यू झाल्याचे नोंद करण्यात आली आहे.
तीन मोबाइल पोलिसांच्या ताब्यात
हिंजवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली त्यावेळी तीन मोबाइल तेथे मिळून आले. तसेच मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या बॅगा देखील होत्या. हेलिकॉप्टर अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. हा अपघात कसा झाला, याच्या संदर्भात डीजीसीए अहवाल देणार आहे. हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल. - कन्हैय्या थोरात, वरिष्ठ पोलिस निरिक्षक, हिंजवडी पोलिस ठाणे