अस्वच्छतेने अपघाताचा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 12:36 AM2018-08-28T00:36:01+5:302018-08-28T00:36:49+5:30
महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष : सांगवी येथील ढोरे-पाटील ग्रेड सेपरेटरमधील समस्या
सांगवी : सांगवी फाट्यावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी व वाहतूक वेगवान होण्यासाठी महापालिकेकडून व पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने नवीन ढोरे पाटील ग्रेड सेपरेटर व महात्मा ज्योतिबा फुले उड्डाण पुलाची निर्मिती लाखों रुपये खर्चून करण्यात आली. परंतु देखभाल व स्वच्छता न ठेवल्यामुळे येथील परिस्थिती धोकादायक ठरू पहात आहे.
सांगवी फाट्यावरील ग्रेडसेपरेटर मध्ये प्रवेश करतांना उड्डाण पूल ओलांडण्या नंतर रस्त्याच्या कडेला माती व चिखल झाल्याने वेगात येणाऱ्या दुचाकी व चारचाकी वाहनांचा अपघात व घसरण्याची स्थिती निर्माण झाली आहे. येथील रस्त्याच्या कडेला चिखल झाल्याने मोठ्या अपघाताचा धोका आहे. ग्रेडसेपरेटरमध्ये पुरेसा प्रकाश नसून आतील विद्युत दिवे बंद आहेत. तीव्र वळण असल्याने वानधारकांचा गोंधळ होतो. साधारण २५ मीटरनंतर औंध, पुणे जिल्हा रुग्णालयासठी व सांगवीकडे असे दोन मार्ग दिसून येतात. पण ग्रेड सेपरेटरमध्ये पुरेसा प्रकाश व विद्युत दिवे नसल्याने वाहनचालकांना नेमका कोणता मार्ग कुठे जातो हे लक्षात येत नाही. गोंधळून जाऊन वेगात असलेल्या वाहनावर नियंत्रण ठेवणे वाहनचालकांना कठीण जाते. त्यासाठी ग्रेडसेपरेटरमध्ये विद्युत दिवे व दोन रस्ते ज्या ठिकाणी विभागले जातात त्या ठिकाणी सिग्नल अथवा रेडियम रिफ्लेकटर दिशादर्शक लावण्यात यावा, अशी मागणी करण्यात येत आहे. येथे दिशादर्शक नसल्याने मोठ्या अपघातास कारण ठरू शकते. याची दखल घेऊन लवकरात लवकर येथे दिशादर्शक बसवण्यात यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
उघड्या वीजतारांमुळे धोका
सांगवी : नवी सांगवी परिसरातील महापालिका पथदिव्यांच्या खांबांमधील वीजतारा बाहेर आल्या आहेत. त्यामुळे येथे अपघाताचा धोका आहे. सांगवीतील अनेक ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा महापालिकेकडून नवीन एलईडी पथदिवे बसवण्यात आले आहेत. त्यासाठी या वीजतारांचा जोड देण्यात आला आहे. मात्र त्या उघड्यावर असल्याने धोका आहे.
जुन्या खांबांवर वीज दिव्यांना वरून तारा होत्या. पण नवीन पथदिव्यांना खांबांतून वीजवाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. दुरुस्ती करताना या वायरचा जोड उघड्यावर राहिले आहेत. त्यामुळे उघड्या वीज तारा धोकादायक ठरत आहेत. महापालिकेकडून लवकरात लवकर या संदर्भात उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.