क्रिएटिव्ह पब्लिक स्कूलची मान्यताही बोगस; नौशाद शेख याच्या विरोधात आणखी एक गुन्हा दाखल
By नारायण बडगुजर | Published: February 19, 2024 11:02 AM2024-02-19T11:02:24+5:302024-02-19T11:03:51+5:30
शनिवारी दाखल झालेला हा त्याच्या विरोधातील आठवा गुन्हा आहे....
पिंपरी : निवासी शाळेतील विद्यार्थिनींवर अत्याचार केल्याच्या आरोपाखाली अटक असलेल्या नौशाद अहमद शेख (५८) याची क्रिएटिव्ह एज्युकेशन सोसायटी संचलित क्रिएटिव्ह पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ही संस्था बोगस असल्याचे समोर आले आहे. या शाळेने मान्यतेचे बनावट पत्र तयार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला. शेख याच्या विरोधात यापूर्वी सात गुन्हे दाखल झाले. त्यानंतर शनिवारी दाखल झालेला हा त्याच्या विरोधातील आठवा गुन्हा आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनातील अधिकारी महिलेने याप्रकरणी रावेत पोलिस ठाण्यात शनिवारी (दि. १७) फिर्याद दिली. त्यानुसार नौशाद शेख आणि एका महिलेच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रावेत येथील क्रिएटिव्ह एज्युकेशन सोसायटी पुणे द्वारे संचलित क्रिएटिव्ह पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज या शाळेला सीबीएससी मंडळाची संलग्न करण्यासाठी राज्य शासनाची परवानगी आवश्यक आहे. मात्र शेख याने उपसचिव, महाराष्ट्र शासन यांच्या सहीचे एक बनावट पत्र तयार केले आणि त्या शाळेला सीबीएससी मंडळाची मान्यता असल्याचे भासवले.
दरम्यान, विद्यार्थिनींवर अत्याचार केल्याप्रकरणी शेख याच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. त्यात त्याला अटक झाली. या प्रकरणाचा समांतर तपास पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून सुरू करण्यात आला. तसेच क्रिएटिव्ह ॲकॅडमी ही निवासी शाळा ज्या इमारतीत होती ते बांधकाम पाडण्यात आले. महापालिकेने शेख याच्या शाळेवर बुलडोजर फिरवला. त्यानंतर शाळेच्या मान्यतेच्या कागदपत्रांची तपासणी केली असता, बोगस कागदपत्रांचा वापर करून मान्यता असल्याचे भासवण्यात आले. यातून पालकांची दिशाभूल करण्यात आली. तसेच शासनाची फसवणूक करण्यात आली. त्यानुसार महापालिका प्रशासनाकडून रावेत पोलिसांकडे तक्रार करण्यात आली. विद्यार्थिनींवर अत्याचार केल्याप्रकरणी शेख याच्या विरोधात २०१४ मध्ये एक गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर त्याच्यावर विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार प्रकरणी दोन आणि विनयंभगप्रकरणी चार गुन्हे दाखल झाले. त्यापाठोपाठ शनिवारी (दि. १७) देखील नव्याने एक गुन्हा दाखल झाला.