नऊ वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारा आरोपी जेरबंद ;युनिट तीनची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2020 04:00 PM2020-08-19T16:00:30+5:302020-08-19T16:01:34+5:30

महत्वाच्या गुन्ह्यांमध्ये हव्या असलेल्या आरोपीला आळंदी येथून घेतले ताब्यात

Accused arrested who needful to police for nine years | नऊ वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारा आरोपी जेरबंद ;युनिट तीनची कारवाई

नऊ वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारा आरोपी जेरबंद ;युनिट तीनची कारवाई

Next

पिंपरी : आपले वास्तव्य सातत्याने बदलून गेल्या नऊ वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या आरोपीला जेरबंद करण्यात यश आले. पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट तीनच्या पोलिसांनी ही कारवाई केली. आरोपी याच्या विरोधात आळंदी पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल आहेत.
नारायण माणिकराव गाडेकर पाटील उर्फ नारायण यशवंत पाटील (वय ३०, रा. पदमावती रोड, आळंदी, ता. खेड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर बाबर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी २०११ पासून फरार होता. त्याला २०१८ मध्ये न्यायालयाने फरार घोषित केले. आरोपी याच्या विरोधात आळंदी पोलीस ठाण्यात २०११ मध्ये घरफोडी, जबरी चोरीचे तीन आणि २००८ मध्ये फसवणुकीचा एक असे एकूण चार गुन्हे दाखल आहेत. २०११ मध्ये जबरी चोरीचा गुन्हा केल्यानंतर आरोपी पळून गेला होता. तेव्हापासून तो वारंवार आपले अस्तित्व बदलून पोलिसांना गुगारा देत होता. आरोपी आळंदी येथे मंगळवारी (दि.१८) येणार आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याला सायंकाळी पाचच्या सुमारास ताब्यात घेतले. गुन्हे केले असल्याचे त्याने चौकशी दरम्यान कबूल केले. पोलिसांनी आरोपी याला अटक करून पुढील कारवाईसाठी आळंदी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
दरम्यान फरार आरोपींचा शोध घेण्याचे आदेश पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी दिले. त्यानुसार, गेल्या तीन महिन्यांपासून गुन्हे शाखा युनिट तीनचे पोलीस आरोपीच्या मागावर होते. पोलिसांनी आरोपीच्या नातेवाईकांशी संपर्क साधून त्याची माहिती घेतली. पद्मावती झोपडपट्टी, गाढवे वस्ती आणि इतर काही ठिकाणी त्याचा शोध घेतला. 
गुन्हे शाखा युनिट तीनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर बाबर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश कांबळे, पोलीस उपनिरीक्षक गिरीश चामले, पोलीस कर्मचारी गंगाधर चव्हाण, विठ्ठल सानप, हजरत पठाण, सचिन मोरे, यदु आढारी, त्रिनयन बाळसराफ, महेश भालचिम, राजकुमार हनमंते, सागर जैनक, योगेश्वर कोळेकर, प्रमोद ढाकणे, नाथा केकान, राहुल सूर्यवंशी यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

Web Title: Accused arrested who needful to police for nine years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.