पाच लाखांच्या मोबाईलसह आरोपी जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2019 08:38 PM2019-02-11T20:38:43+5:302019-02-11T20:39:45+5:30
विक्रीसाठी आणलेले चोरीचे ५ लाख ८५ हजार रुपये किमतीचे ६७ मोबाईल यासह दोन चोरट्याना अटक करण्यात आली.
पिंपरी : विक्रीसाठी आणलेले चोरीचे ५ लाख ८५ हजार रुपये किमतीचे ६७ मोबाईल यासह दोन चोरट्याना अटक करण्यात आली. तर एका अल्पवयीन आरोपीला गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. ही कारवाई नाशिकफाटा, कासारवाडी येथे करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमिन सज्जाद इनामदार (व २५, रा. आदर्शनगर, मोशी) आणि शेखर संभाजी जाधव (वय १९, रा. दिघीरोड, स्वययंभु गणेश मंदिराजवळ, भोसरी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपीची नावे आहेत. एक अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. गुन्हे शाखा युनिट १ चे सहायक पोलीस निरीक्षक गणेश पाटील हे भोसरी पोलीस ठाणे परिसरात गस्तीवर होते. यावेळी त्यांना त्यांच्या खबऱ्यांकडून चोरट्यांविषयी माहिती मिळाली. नाशिकफाटा परिसरात एकजण चोरीचे मोबाईल विक्री करण्यासाठी येणार आहे. यावर पोलिसांनी त्या ठिकाणी सापळा रचून अमिन याला तर शेखर आणि त्याच्या अल्पवयीन साथीदाराला भोसरी ओव्हर ब्रीज खालून ताब्यात घेतले. या तिघांची कसून चौकशी केली असता अमिन याने १३ मोबाईल हे भोसरी परिसरातून चालत बोलत जाणाऱ्याचे चोरले, शेखर याने ४१ मोबाईल उघड्या दरवाजा आणि खिडकी वाटे चोरल्याचे सांगितले. तर अल्पवयीन आरोपीकडून १३ मोबाईल हस्त करण्यात आले. गुन्हे शाखेने असे एकूण ५ लाख ८५ हजार रुपये किमतीच्या ६७ मोबाईल या तिघांकडून जप्त केले. यातील अमिन आणि शेखर हे सराईत मोबाईल चोरटे आहेत.
दरम्यान भोसरी, भोसरी एमआयडीसी आणि परिसरातून ज्या कुणाचे मोबाईल चोरीला गेले असतील त्यांनी गुन्हे शाखा युनिट 1 शी संपर्क साधावा असे आवाहन पाेलिसांकडून करण्यात आले आहे.