सोन्याच्या भिशीच्या नावाखाली फसवणूक करणारा आरोपी जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2020 01:11 PM2020-09-23T13:11:15+5:302020-09-23T13:12:41+5:30
आरोपीविरोधात देहूरोड तसचे तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात चार गुन्हे दाखल
पिंपरी : सोन्याच्या भिशीच्या नावाखाली फसवणूक करणारा मोकातील फरार आरोपी पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे. पिंपरी-चिंचवडपोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट पाचच्या पोलिसांनी ही कामगिरी केली. आरोपीविरोधात देहूरोड तसचे तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात चार गुन्हे दाखल आहेत.
संजय मारुती कारले (वय 42, रा. यशवंतनगर, तळेगाव दाभाडे), असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. युनिट पाचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी राबविलेल्या झीरो टॉलरन्स मोहिमेअंतर्गत गुन्ह्यांना प्रतिबंध व्हावा या अनुषंगाने युनिट पाचकडून गुन्हेगारांचा शोध घेण्यात येत असताना पोलीस कर्मचारी दत्तात्रय बनसुडे व सावन राठोड यांना माहिती मिळाली, तळेगाव दाभाडे, देहुरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये सोन्याच्या भिशीच्या नावाखाली फसवणुकीचे गुन्हे करुन फरार झालेला आरोपी संजय कारले हा त्याच्या राहत्या घरी तळेगाव दाभाडे येथे येणार आहे. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला. पोलीसांचा सुगावा लागताच आरोपी पळ काढु लागला. त्यास शिताफीने पकडून ताब्यात घेतले. त्याने सोन्याच्या भिशीच्या नावाखाली देहुरोड व तळेगाव भागामध्ये लोकांची फसवणूक केली असल्याचे कबुल केले. मोकाअंतर्गत तो फरार असून, देहुरोड पोलीस ठाण्यात तीन तर तळेगाव पोलीस ठाण्यात एक असे चार गुन्हे दाखल आहेत. त्याला देहुरोड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
गुन्हे शाखा युनिट पाचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत, सहायक पोलीस निरीक्षक राम गोमारे, पोलीस कर्मचारी धनराज किरनाळे, दत्तात्रय बनसुडे, संदीप ठाकरे, मयुर वाडकर, गणेश मालुसरे, ज्ञानेश्वर गाडेकर, श्यामसुंदर गुट्टे, धनंजय भोसले, स्वामीनाथ जाधव, फारुक मुल्ला, सावन राठोड, नितीन बहिरट, भरत माने, राजकुमार इघारे, दयानंद खेडकर, गोपाळ ब्रम्हांदे व राजेंद्र कदम यांच्या पथकाने ही कामगिरी केली.