सोमाटणे फाटा येथील खुनी हल्ल्यातील आरोपीला १६ तासांत अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2019 04:10 PM2019-12-16T16:10:16+5:302019-12-16T16:33:03+5:30
सोमाटणे फाटा येथे केला होता हल्ला
पिंपरी : पूर्वीच्या भांडणाच्या कारणावरून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यात एक जण गंभीर जखमी झाला. मावळ तालुक्यातील परंदवडी- सोमाटणे रस्त्यावर शनिवारी (दि. १४) सायंकाळी साडेसातच्या सुमारास हा खुनी हल्ला झाला होता. याप्रकरणातील आरोपीला १६ तासांत अटक करण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या खंडणी-दरोडा विरोधी पथकाने ही कारवाई केली.
केतन पोकळे (वय २२, रा. सोमाटणे फाटा, ता. मावळ) असे अटक करण्यात आलेल्या आरापीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदित्य विलास गराडे व रोहन दिनकर गराडे हे दोघे दुचाकीवरून एका कंपनीमध्ये चहा घेऊन जात होते. त्यावेळी प्रसाद उर्फ परशा टेंभेकर (रा. उर्से), आकाश साळुंखे (रा. चौराईनगर, सोमाटणे फाटा), केतन पोकळे (रा. सोमाटणे फाटा), हर्षद भोकरे (रा. शिवणे), अनु उर्फ अनुराधा काळे (रा. तळेगाव दाभाडे) व इतर दोन अनोळखी व्यक्ती अशा सात जणांनी त्यांचा पाठलाग केला. त्यांनी रोहन गराडे याला पूर्वीच्या भांडण्याच्या कारणावरून जीवे मारण्याच्या उद्देशाने त्याच्यावर कोयत्याने वार करून, लाथा बुक्कयांनी मारहाण केली. याप्रकरणी आदित्य गराडे याने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी सात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
खुनी हल्ल्यातील या फरार आरोपींचा तळेगाव दाभाडे परिसरात शोध घेत असताना आरोपी केतन पोकळे हा साईनगर, साई मंदिराचे समोर, देहुरोड येथे थांबलेला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आले. साथीदारांसह त्याने खुनी हल्ला केल्याची कबुली दिली.
खंडणी-दरोडा विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत, पोलीस उपनिरीक्षक पुरुषोत्तम चाटे, अनिकेत हिवरकर पोलीस कर्मचारी अजय भोसले, उमेश पुलगम, निशांत काळे, किरण काटकर, आशिष बोटके, शरीफ मुलाणी, सागर शेडगे, आशिष बनकर व गणेश कोकणे यांच्या पथकाने ही कारवाई केली.