त्या’ आरोपींचा जामीन होणार रद्द; बनावट कागदपत्रांच्या आधारे जामीन मिळवून देण्याचे प्रकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 09:53 PM2021-06-17T21:53:28+5:302021-06-17T21:54:04+5:30
जामिनासाठी बनावट कागदपत्रे सादर केल्याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करून सहा आरोपींना अटक करण्यात आली.
पिंपरी : गंभीर गुन्ह्यात अटक असलेल्या आरोपींच्या जामिनासाठी बनावट कागदपत्रे तयार करून न्यायालयाची दिशाभूल केल्याचा प्रकार पिंपरी येथे मंगळवारी (दि. १५) उघडकीस आला. अशा पद्धतीने जामीन मिळविलेल्या आरोपींवर देखील पुन्हा गुन्हे दाखल करण्यात येतील, अशी माहिती पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिली.
जामिनासाठी बनावट कागदपत्रे सादर केल्याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करून सहा आरोपींना अटक करण्यात आली. त्याबाबत माहिती देताना कृष्ण प्रकाश म्हणाले, गंभीर गुन्ह्यात अटक आरोपींना जामीन करून देण्यासाठी अटक केलेले आरोपी हे बनावट कागदपत्रे तयार करत असत. त्यामध्ये आधार कार्ड, रेशनिंग कार्ड, सातबाराचे उतारे, अशी शासकीय दस्तऐवज जामीन मिळवून देण्यासाठी तयार केली जात. जे आरोपी जामिनावर सुटल्यानंतर पुन्हा कोर्टाच्या कामासाठी हजर राहणार नाहीत, अशा आरोपींना जामीन देण्यासाठी बनावट कागदपत्रांच्या आधारे बनावट नावे धारण करून कोर्टात जामीनदार म्हणून हजर केले जात असे. त्याआधारे आरोपींना कोर्टातून जामिनावर सोडले जात असत. आरोपींनी न्यायालयाची दिशाभूल करून वेगवेगळ्या गुन्ह्यातील अटक आरोपींचा जामीन करून घेण्यासाठी बनावट कागदपत्रांचा वारंवार वापर केला.
जामिनावर सुटलेल्या आरोपींचा घेणार शोध
दोन्ही गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपींनी कोणत्या न्यायालयात जामिनासाठी बनावट कागदपत्रे सादर केली, याचा तपास करण्यात येणार आहे. तसेच किती आरोपींना अशा पद्धतीने जामीन मिळाला, त्याचाही शोध घेण्यात येईल. अशा जामिनावर सुटलेल्या आरोपींच्या विरोधात पुन्हा गुन्हे दाखल केले जातील, असे कृष्ण प्रकाश यांनी सांगितले.
आधार कार्डची पडताळणी व्हावी
महसूल विभागाप्रमाणेच न्यायालय व पोलिसांकडे आधारकार्डची पडताळणी करण्याची यंत्रणा उपलब्ध होणे आवश्यक आहे. आधार कार्ड लिंक झाल्यास अशा पद्धतीने बनावट कागदपत्रे सादर करण्याच्या प्रकारांना आळा बसण्यास मदत होईल. ही बाब शासनाच्या निदर्शनास आणून देण्यात येईल, असेही कृष्ण प्रकाश म्हणाले.