आयटी पार्क हिंजवडीत बेधडक अतिक्रमण कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2018 03:01 PM2018-09-08T15:01:50+5:302018-09-08T15:03:29+5:30
शनिवारी सकाळी ११ वाजल्यापासून हिंजवडीतील शिवाजी चौकापासून वाकड रस्त्यावरील डीमार्ट तुळजा भवानी मंदिरापर्यंत सुमारे शंभरहून अधिक अतिक्रमणे हटविण्यात आली आहेत.
पिंपरी-चिंचवड (वाकड) : गेल्या आठ दहा दिवसांपासून आयटी नगरी हिंजवडीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न गाजत असताना एमआयडीसी व वाहतूक पोलीस यांनी सुट्टीच्या दिवशी मोठ्या पोलीस बंदोबस्तात पाच जेसीबीच्या साहायाने शनिवारी (दि ८) सकाळपासूनच संयुक्त अतिक्रमण हटाव कारवाईला सुरुवात केली आहे.
हिंजवडी च्या वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर येताच या आठवड्यात एमआयडीसीचे, पोलीस अधिकारी यांच्यासह हिंजवडीच्या स्थानिक पुढारी व आयटीयन्सने आयटीतील विविध रस्त्यांची व समस्यांची पाहणी केली होती. यावेळी वाहतूक समस्येत भर घालणाऱ्या अतिक्रमणावर पोलीस बंदोबस्तात कारवाई करणार असल्याचे एमआयडीसीचे कार्यकारी अभियंते निलेश मोढवे यांनी संगीतले होते.शनिवारी सकाळी ११ वाजल्यापासून हिंजवडीतील शिवाजी चौकापासून वाकड रस्त्यावरील डीमार्ट तुळजा भवानी मंदिरापर्यंत सुमारे शंभरहून अधिक अतिक्रमणे हटविण्यात आली आहेत. या कारवाईला हिंजवडी पोलीस, हिंजवडी वाहतूक विभागातील पोलीस अधिकारी व कर्मचारी याताफ्यासह एमआयडीसीचे अधिकारी उपस्थित आहेत.