चिंचवडमध्ये २१ अल्पवयीन वाहन चालकांवर कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2020 12:53 PM2020-02-26T12:53:53+5:302020-02-26T12:55:23+5:30
वाहतूकीचे नियम न पाळता कशाही पद्धतीने वाहने चालविणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्यांच्या दुचाकी पाेलिसांनी ताब्यात घेतल्या.
चिंचवड: वेळ सकाळी आठ वाजताची चिंचवड गावातील शाळा व महाविद्यालय परिसरात विद्यार्थ्यांची मोठी वर्दळ होती. अनेक विद्यार्थी दुचाकी घेऊन रस्त्यावर फिरत होते.अचानक चिंचवड वाहतूक शाखेचे अधिकारी व कर्मचारी या भागात दाखल झाले.पोलिसांचा ताफा पाहून विद्यार्थ्यांची धावपळ सुरू झाली.यावेळी २१ अल्पवयीन वाहन चालविणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गाड्या ताब्यात घेण्यात आल्या.या विद्यार्थ्यांच्या पालकांना वाहतूक शाखेत बोलविण्यात आले.भयभीत झालेल्या या दुचाकी स्वरांना व पालकांना लेखी समज देऊन सोडण्यात आले.मात्र या वेळी विद्यार्थ्यांची बोलती बंद झाली होती.
चिंचवड मधील शाळा व महाविद्यालय परिसरात अनेक विद्यार्थी मनमानी पद्धतीने वाहने चालवत असल्याचे प्रकार वाढले होते.यावर कारवाई करण्यासाठी चिंचवड वाहतूक शाखेने आज कारवाई चा बडगा उगारला. या कारवाईत तब्बल २१ अल्पवयीन वाहन चालकांच्या दुचाकी ताब्यात घेण्यात आल्या.संबंधित वाहन चालकांच्या पालकांना वाहतूक शाखेत बोलाविण्यात आले.त्यांना लेखी समज देऊन सोडण्यात आले.रस्त्यावरील टवाळखोरी व वाढत्या अपघातांच्या घटना रोखण्यासाठी वाहतूक शाखेने अल्पवयीन वाहन चालकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.
या कारवाई करण्यात आलेल्या वाहनचालकांना व पालकांना या बाबत समज देण्यात आला.वारंवार सांगूनही मुलं ऐकत नसल्याच्या संतप्त भावना पालकांनी व्यक्त केल्या.मात्र विना परवाना वाहन चालविल्यामुळे घडणाऱ्या घटनांबाबत वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांनी पालकांना व वाहनचालकांना माहिती दिली.या वेळी विद्यार्थी पालकांसमोर मान खाली टाकून चुका मान्य करत होते.या पुढे पुन्हा पुन्हा चुका करणार नसल्याचे विद्यार्थ्यांनी कबुल केले.या प्रकारची कारवाई या पुढेही सतत सुरू राहणार असल्याचे पोलीस उपनिरीक्षक मनीषा हाबळे यांनी सांगितले.मुलांचे हट्ट पुरविण्याचे चुकीचे काम पालक करत असतात.या मुळे अपघाताच्या घटना घडत आहेत.वाहन परवाना असल्याशिवायात मुलांच्या हातात वाहने देऊ नये असे आवाहन वाहतूक शाखेच्या वतीने देण्यात आले आहे.ही कारवाई पोलीस निरीक्षक खंडेराव खैरे,उपनिरीक्षक मनीषा हाबळे,एस.व्ही जाधव कर्मचारी तौसीफ महात,खंडेराव नलगे, आबासाहेब सावंत, एस.बी कांबळे,अमृता मतरे यांनी केली.