चार मजली अनधिकृत बांधकाम भुईसपाट, पिंपरी चिंचवड महापालिकेची कारवाई
By विश्वास मोरे | Published: March 18, 2024 10:52 AM2024-03-18T10:52:01+5:302024-03-18T10:52:53+5:30
महापालिकेच्या 'क' क्षेत्रीय कार्यक्षेत्रातील चिखली रिव्हर रेसिडन्सी मागील चार मजली बांधकामावर रविवार दुपारी बुलढोजर फिरविला...
पिंपरी : इंद्रायणी नदीपात्र क्षेत्रात अनधिकृत बांधकामे सुरु आहेत. महापालिकेच्या 'क' क्षेत्रीय कार्यक्षेत्रातील चिखली रिव्हर रेसिडन्सी मागील चार मजली बांधकामावर रविवार दुपारी बुलढोजर फिरविला. पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे - पाटील यांनी अनधिकृत बांधकामावर कारवाईचे आदेश दिले आहेत. क क्षेत्रीय कार्यालयाचे पथकामार्फत उपआयुक्त अण्णा बोदडे, उपअभियंता सुर्यकांत मोहिते यांच्या नेतृत्वाखाली कनिष्ठ अभियंता किरण सगर, रचना दळवी तसेच स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक निकिता फडतरे, स्मिता गव्हाणे यांच्यासह महापालिका कर्मचारी, महाराष्ट्र सुरक्षा बल, महाराष्ट्र पोलिस, यांच्या नियंत्रणाखाली कारवाई केली.
प्रभाग क्र.०२ चिखली, जाधववाडी परिसरातील सुमारे १० हजार ३०० चौ.फुट आरसीसी बांधकामावर अतिक्रमण निष्कासनाची कारवाई केली. शहराच्या विविध भागात अतिक्रमण कारवाई केली जात आहे. नागरिकांनी रस्त्यांवर बेवारस वाहने उभी करुन नये, तसेच अनधिकृत टप-या व पत्राशेड व बॅनर्स उभारु नये. तसेच फ़ुटपाथ स्वच्छ ठेवण्यासाठी सहकार्य करावे
कारवाई केलेल्या ठिकाणी मनपा परवानगी घेतल्याशिवाय अनधिकृत पत्राशेड, बांधकाम करु नये, अशा सुचना देण्यात आल्या. नदी पात्र व इतर परिसरात नागरिकांनी अनधिकृत विनापरवाना बांधकाम करू नये.
- शेखर सिंह (आयुक्त तथा प्रशासक)