पिंपरीत बेशिस्त वाहतूकीला लगाम, अतिक्रमणांवरही कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 04:56 PM2018-09-18T16:56:02+5:302018-09-18T17:04:45+5:30
हिंजवडी, वाकड परिसरातील वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी पोलिसांनी उपाययोजना हाती घेतल्या आहेत, त्यात उलट दिशेने येणाऱ्या बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई केली जात आहे.
पिंपरी : हिंजवडी, वाकड परिसरातील वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी पोलिसांनी उपाययोजना हाती घेतल्या आहेत, त्यात उलट दिशेने येणाऱ्या बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई केली जात आहे. त्याचबरोबर आता रहदारीस अडथळा ठरणाऱ्या हातगाड्या, टपऱ्या जप्तीची कारवाई केली जात आहे. सोमवारी झालेल्या कारवाईत डांगे चौकातील १५ हातगाड्या आणि ४ टपऱ्या जप्त करण्यात आल्या आहेत. मंगळवारी या परिसरात रस्ते काही अंंशी मोकळे झाल्याचे दिसून आले.
पोलीस आयुक्त आर.के.पद्मनाभन यांनी हिंजवडी, वाकड परिसरातील वाहतुक कोंडीवर उपाययोजना करण्यासाठी अधिक लक्ष वेधले आहे. प्रायोगिक तत्वावर वाहतुक मार्गात काही बदल केले आहेत. केवळ हिंजवडी, वाकड हाच परिसर नाही तर उलट दिशेने वाहन चालवुन अपघातास निमंत्रण देणारी परिस्थिती निर्माण करणाऱ्या वाहन चालकांविरूद्धच्या कारवाईची तीव्र मोहिम संपूर्ण शहरात राबवली जात आहे. सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत ठिकठिकाणी पोलीस पथके उलट दिशेने वाहन चालविणाऱ्यांवर कारवाई करीत आहेत. मोठ्या प्रमाणावर ही मोहिम सुरू आहे.
महापालिका अतिक्रमण विभाग आणि वाकड पोलीस यांच्या वतीने डांगे चौकातील वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या हातगाडी आणि दुकानांवर कारवाई करण्यात आली. या पुढील काळात देखील वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या हातगाडया, दुकाने यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. बेशिस्त पार्किंग तसेच वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करण्यात येत आहे.
भारतीय दंड संहिता २७९ नुसार कारवाई
वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करुन उलट दिशेने निष्काळजीपणे वाहन चालवुन धोकादायक परिस्थिती निर्माण करणाऱ्या वाहन चालकांवर भारतीय दंड संहिता कलम २७९ प्रमाणे गुन्हा दाखल करा. असे आदेश आयुक्त आर.के.पद्मनाभन यांनी दिल्यानंतर शहरात सर्वत्र कारवाई सुरू आहे. रोज २० ते २५ वाहन चालकांवर अशी कारवाई होत आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकाला भारतीय दंड संहितेच्या कलम २७९ नुसार विशिष्ट कालावधीसाठी कारावासाची शिक्षा सुनावली जाते. त्यात सहा महिन्यापर्यंत वाढ करण्याची तरतुद आहे. कारावास आणि एक हजार रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. वाहन चालकांनी उलट दिशेने वाहने चालवु नयेत. असे आवाहन पोलिसांनी केले. आहे.