सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्यास कारवाई; पिंपरी-चिंचवड पोलिसांची करडी नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2020 04:57 PM2020-06-16T16:57:39+5:302020-06-16T17:08:49+5:30
पोलिसांकडून सोशल मीडियातून पसरविल्या जाणाऱ्या अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेऊ नये, तसेच त्याला बळी पडू नये असे आवाहन
पिंपरी : सांगवी येथील पिंपळे सौदागर येथे झालेल्या खून प्रकरणाला जातीय रंग देऊन सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. सोशल मीडियावर आक्षेपार्ह मेसेज टाकले जात आहेत. अशा पोस्टवर पिंपरी-चिंचवडपोलिसांची करडी नजर आहे. तसेच सामाजिक सलोखा बिघडविल्यास कठोर कारवाई होईल, असे पिंपरी-चिंचवडपोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
सांगवी येथील पिंपळे सौदागर परिसरात एका तरुणावर शस्त्राने वार करून त्याला जखमी केले. त्याचा उपचारादरम्यान ८ जून रोजी मृत्यू झाला. याबाबत सहा जणांवर अनुसूचित जाती जमाती अधिनियम आणि खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. त्यातील सहा जणांना अटक केली. करण्यात आली असून सध्या ते आरोपी पोलीस कोठडीमध्ये आहेत. या प्रकरणाचा तांत्रिक आणि शास्त्रोक्त पद्धतीने सखोल तपास सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव करीत आहेत.
या प्रकरणाला काही समाजकंटक जाणीवपूर्वक जातीय सलोखा बिघडविण्यासाठी खोडसाळपणे प्रक्षोभक, आक्षेपार्ह आणि चिथावणीखोर पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल करीत आहेत. त्यामुळे पिंपरी-चिंचवड पोलीस व्हाटस अप, फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, हॅलो, टेलिग्राम व टिकटॉक व्हिडीओ अशा सोशल मीडियावर नजर ठेऊन आहेत.
सोशल मीडियातून पसरविल्या जाणाऱ्या अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेऊ नये, तसेच त्याला बळी पडू नये असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. तसेच सामाजिक सलोखा बिघडविणाऱ्यांवर पोलिसांकडून प्रचलित कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.