इंद्रायणी नदीतील अवैध वाळू उपसावर कारवाई; 1 कोटी 31 लाखांचा मुद्देमाल जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2021 04:47 PM2021-03-20T16:47:37+5:302021-03-20T16:48:01+5:30
१४ जणांना अटक; मुख्य सूत्रधार राजकीय पक्षाशी संबंधित
पिंपरी : इंद्रायणी नदीपात्रात जलपर्णी फोफावली असतानाही तेथे वाळूचा अवैध उपसा होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी कारवाई करून पोकलेन मशीन, ट्रॅक्टर, १४ ब्रॉस वाळू, असा एक कोटी ३१ लाख २८ हजार रुपयांचा मुदेद्माल हस्तगत केला. तसेच याप्रकरणी १४ आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्याात आली आहे. यातील मुख्य सूत्रधार असलेला एक आरोपी एक राजकीय पक्षाशी संबंधित असल्याचे समोर आले आहे.
केतन रामदास कोलते (वय २७, रा. बेकोरी, हवेली), योगेश सुरेश वाळुंज (वय २९, रा. लोणीकंद, ता. हवेली), संदेश नंदकुमार कारले (वय २५, रा. देवाची आळंदी, ता. खेड), दीपक भाऊसो येळे (वय २८), अतुल बाबाजी येळे (वय २५, दोघे रा. पारोडी, शिरुर), अजहर मजहर शेख (वय २९, रा. लातूर), अंकुश अजयराम कुमार (वय १९, रा. तिवरा, बिहार), अर्जुन जीवन चव्हाण (वय १९, रा. कारोळ, ता. पुसद, जि. यवतमाळ), सोहेल मौला पठाण (वय २८, रा. च-होली खुर्द, ता. हवेली), सुधीर बाळू राठेाड (वय २५, रा. कारोळा, ता. पुसद, जि. यवतमाळ), विलास सुद्राम येळे (वय ३०, रा. पारोडी, ता. शिरुर), सारीक अजिज पठाण (वय ३१, रा. च-होली बुद्रूक), रवीकुमार श्रीराम धारीराम (वय २१, रा. खुटेरीया, ता. कुसाहा, जि. गडवा, झारखंड), सचिन बापू वाळके (वय २४, रा. पेरणे, ता. हवेली) अशी अटक करण्या त आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह सतीश लांडगे (रा. भोसरी) आणि अजय (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) यांच्यावरही दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणत अटक केलेला आरोपी केतन कोलते, तसेच पाहिजे असलेला आरोपी सतीश लांडगे आणि अजय हे मुख्य सूत्रधार असल्याचे तपासात पुढे आले आहे.
पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, इंद्रायणी नदीपात्रालगत च-होली गावाच्या हद्दीत रात्री वाळू उपसा सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखेला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. पोलिसांच्या पथकाने १९ मार्चला रात्री नदीपात्राच्या अलीकडे दोन ते तीन किलोमीटर अंतरावर वाहने पार्क करून पायी गेले. नदीपात्रालगत पथक दबा धरून बसले. त्यावेळी चार ट्रॅक्टर, दोन पोकलेन मशीनच्या सहाय्याने वाळूचा उपसा सुरू होता. नदीपात्रात जलपर्णी असलेल्या ठिकाणी पाण्यात उतरून वाळू चाळणीने चाळून ते ट्रॅक्टरमध्ये भरण्यात येत होती. त्यावेळी पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली.
वाळू माफियांच्या मुसक्या आवळणार
शहरातील वाळू उपसा होत आल्याचा प्रकार या कारवाईमुळे उघडकीस आले आहे. तसेच त्याला राजकीय पदाधिका-यांकडून पाठबळ असण्याची शक्यता आहे. हा बाब गंभीर असून, या प्रकरणाची पाळेमुळे खोदून काढण्यात येतील, असे कृष्ण प्रकाश यांनी सांगितले. वाळूचा अवैध उपसा करणा-या माफियांमध्ये आणखी कोणी बड्या हस्तींचा सहभाग आहे का, याचाही तपास सुरू आहे.