डास उत्पत्तीस प्रोत्साहन दिल्याने महामेट्रोवर कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2019 07:49 PM2019-11-26T19:49:11+5:302019-11-26T19:49:46+5:30
शहरात स्वारगेट ते पिंपरी या मेट्रोचे काम सुरू.
पिंपरी : शहरात स्वारगेट ते पिंपरी या मेट्रोचे काम सुरू आहे. महामेट्रोच्या नाशिक फाटा चौकाजवळील पिंपळे गुरव येथील कॉस्टींग यार्डमधील लेंबर कॅम्पमध्ये डास उत्पत्ती ठिकाणे आढळून आली आहेत. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाने ठेकेदार एनसीसी या कंपनीस पंधरा हजार रूपयांचा दंड आकारला आहे.
पुणे-मुंबई जुन्या महामार्गावरील दापोडीच्या हॅरिस पुल ते चिंचवडच्या एम्पायर इस्टेट अशा साडेसात किलोमीटर अंतरावर काम सुरू आहे. मेट्रो स्पॅनसाठी सेगमेंटची निर्मिती नाशिक फाटा चौकाजवळील पिंपळे गुरव येथील कॉस्टींग यार्ड येथे केली जात आहे. याच ठिकाणी मेट्रोचा लेंबर कॅम्प आहे. त्या ठिकाणी तपासणी केली असता डास उत्पत्ती होत असल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागास आढळून आले.
त्यामुळे पालिकेच्या पथकाने महामेट्रोच्या एनसीसी या ठेकेदारास पंधरा हजारांचा दंड केला आहे. डास उत्पत्ती होणार नाही, याची दक्षता घेण्याचे सक्त बजावले आहे. याच कॉस्टींग यार्डमधून राडारोडा पवना नदी पात्रात टाकला जात असल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर पालिकेने व महाराष्ट्र प्रदूषण महामंडळाने महामेट्रोला नोटीस बजावली होती. त्यामुळे महामेट्रोने तातडीने नदीपात्रात टाकलेला राडारोडा काढून घेतला होता. तसेच, ठेकेदारावर दंडात्मक कारवाई केली होती. या प्रकारची तपासणी मोहिम पालिकेकडून सुरू आहे. बांधकाम व हॉटेल व्यावसायिकांना या पूर्वी पाच हजारांचा दंड केला आहे.
मेट्रोच्या साहित्यावर पावसाचे पाणी साचून
दापोडी ते चिंचवडपर्यंत रस्त्यावर मेट्रोचे मोठ्या प्रमाणात साहित्य पडून आहे. बॅरिकेट्स, लोखंडी सांगाडे, फ्रेम, खांब, साहित्य ठिकठिकाणी अनेक महिन्यांपासून पडून आहेत. तसेच, मेट्रोने अनेक ठिकाणी खड्डे घेतले आहेत. त्यात पावसाचे पाणी साचून डास उत्पत्ती होत आहे. त्यामुळे त्या भागांतील रहिवाशी, वाहनचालक आणि मेट्रोच्या कामगारांना डास चावून विविध आजार होण्याचा धोका निर्माण झाला आहे. या संदर्भात आरोग्य विभागाने तपासणी मोहिम राबवून कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
डॉ. अनिल रॉय म्हणाले, ह्यह्यडासोत्पतीची ठिकाणे शोधून काढावीत, यासाठी प्रभातस्तीरीय आरोग्य विभागास सूचना केल्या आहेत. त्यानुसार तपासणी मोहीम सुरू आहे.ह्णह्ण