लेखा परीक्षण न करणाऱ्या सहकारी संस्थांवर कारवाई
By Admin | Published: June 27, 2017 07:20 AM2017-06-27T07:20:51+5:302017-06-27T07:20:51+5:30
पिंपरी- चिंचवड शहराच्या हद्दीतील सर्व प्रकारच्या सहकारी संस्थांना ३१ जुलै अखेरपर्यंत आपल्या संस्थेचे लेखापरीक्षण करणे बंधनकारक
लोकमत न्यूज नेटवर्क
भोसरी : पिंपरी- चिंचवड शहराच्या हद्दीतील सर्व प्रकारच्या सहकारी संस्थांना ३१ जुलै अखेरपर्यंत आपल्या संस्थेचे लेखापरीक्षण करणे बंधनकारक असल्याचा आदेश सहकार उपनिबंधक कार्यालयाने दिला आहे. तसेच ९७ व्या घटनादुरुस्तीनुसार ज्या सहकारी संस्थांनी मागील वर्षीचे लेखापरीक्षण करण्यासाठी अधिमंडळाच्या वार्षिक बैठकीमध्ये ठरावाद्वारे सहकार खात्याच्या नामतालिकेवरील ज्या लेखापरीक्षकाची नियुक्ती केली असेल, व सहकार विभागाला कळवले असेल अशा संस्थांना त्या लेखापरीक्षकाकडून लेखापरीक्षण करणे बंधणकारक असल्याचेही सांगितले आहे.
शहरातील संख्येने मोठ्या असणाऱ्या सहकारी संस्था व त्यातील आर्थिक व्यवहाराची अनियमितता लक्षात घेता राज्य शासनाच्या सहकार विभागाकडून अशा संस्थांच्या लेखापरीक्षणास गांभीर्याने घेतले आहे. त्यामुळेच या संस्थांना ३१ जुलैपर्यंत आपल्या सहकारी संस्थेचे लेखापरीक्षण १००% करणे बंधणकारक केले आहे. अन्यथा सहकार कलम अन्वये दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील वाढत्या गृहसंस्था पाहता शहरामध्ये उपनिबंधक सहकारी संस्था, पुणे शहर ३ व पुणे शहर ४ अशी दोन उपनिबंधक सहकार कार्यालये आहेत. या कार्यालयामार्फत शहरातील सर्व सहकारी संस्थावर कायदेशीर नियंत्रण ठेवण्याचे काम केले जाते. त्या पार्श्वभूमीवर सहकार विभागाने लेखापरीक्षणाचे आदेश काढले आहेत.
शहराच्या हद्दीतील सहकारी संस्थांनी आपल्या संस्थेच्या वार्षिक सभेत लेखापरीक्षणाचे ठराव पारीत केले नसेल किंवा ठराव विहीत मुदतीत सहकार विभागाच्या संकेतस्थळावर आॅनलाइन प्रसिद्ध केले नसतील किंवा त्या ठरावाची प्रत उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयास दिनांक ३१ आॅक्टोबर २०१६ पर्यंत सादर केली नसेल, तर अशा संस्थांच्या लेखापरीक्षण करण्यासाठी लेखापरीक्षक नियुक्त करण्याचे आदेश जिल्हा उपनिंबधक, सहकारी संस्था पुणे शहर यांनी निर्गमीत केले आहेत. त्यामुळे त्यांनी नियुक्त केलेल्या लेखापरीक्षकांना संबंधित सहकारी संस्थेने आपल्या संस्थेचे दप्तर तत्काळ उपलब्ध करून देणे बंधनकारक राहणार आहे. अशा लेखापरीक्षकाने केलेल्या लेखापरीक्षणाची एक प्रत पिंपरी-चिंचवड शहरातील संबंधित उपनिबंधक कार्यालयास व दुसरी प्रत जिल्हा विशेष लेखापरीक्षक, भूविकास बँक इमारत, दुसरा मजला, गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे, १७ यांच्या कार्यालयास सादर करावी.