ATS ची मोशीत कारवाई; तीन बांगलादेशी नागरिकांना अटक
By नारायण बडगुजर | Published: September 20, 2023 09:44 AM2023-09-20T09:44:03+5:302023-09-20T09:44:41+5:30
दहशतवाद विरोधी पथकाच्या पुणे युनिटने बोऱ्हाडेवाडी मोशी येथे सोमवारी (दि. १८) दुपारी ही कारवाई केली....
पिंपरी : बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतात वास्तव्य करत असल्या प्रकरणी बांगलादेशी तीन नागरिकांना अटक केली. दहशतवाद विरोधी पथकाच्या पुणे युनिटने बोऱ्हाडेवाडी मोशी येथे सोमवारी (दि. १८) दुपारी ही कारवाई केली.
सुकांथा सुधीर बागची (२१), नयन बिंदू बागची (२२), सम्राट बलाय बाला (२२, तिघे मूळ रा. बहादूरपूर, पो. दतोकंदवा, जि. मदारीपूर, बांगलादेश) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात परकीय नागरिक कायदा, पारपत्र अधिनियम, पारपत्र (भारतात प्रवेश) परकीय नागरिक आदेशान्वये गुन्हा दाखल केला.
महाराष्ट्र राज्याच्या दहशतवाद विरोधी पथकाच्या पुणे युनिटला माहिती मिळाली की, बोऱ्हाडेवाडी मोशी येथे एका बांधकाम साईटवर काहीजण बांगलादेश येथून येऊन बेकायदेशीरपणे वास्तव्य करीत आहेत. त्यानुसार दहशतवाद विरोधी पथकाने बोऱ्हाडेवाडी येथील सह्याद्री बांधकाम साईटवरील लेबर कॅम्पमध्ये सोमवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास कारवाई केली.
पोलिसांनी तीन बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे भारतात वास्तव्य करण्याबाबत कोणतीही वैध कागदपत्रे नव्हती. हे तिघेजण भारत-बांगलादेश सीमेवरील मुलकी अधिकाऱ्याच्या लेखी परवानगी शिवाय घुसखोरीच्या मार्गाने भारतात आले असल्याचे चौकशीत समोर आले.
तिघेजण बोऱ्हाडेवाडी येथील सह्याद्री बांधकाम साईटवर काम करत होते. बेकायदेशीरपणे भारतात वास्तव्य केल्याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली. तिघांकडून बांगलादेशी चलन, भारतीय तीन आधार कार्ड, पॅन कार्ड, चार मोबाईल फोन जप्त केले.